Pahalgam Terror Attack: मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. डोंबिवलीतील तीन तर पुण्यातील दोन जण दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले. यानंतर आता दहशतवाद्यांविरोधात भारत सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून पाकिस्तानवर निर्बंध लादले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पहलगाममध्ये जिथे हल्ला झाला, ते ठिकाण नेमकं कुठे आणि कसं आहे, यासंदर्भातला एक सॅटेलाईट व्हिडीओ समोर आला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये जिथे हल्ला झाला, त्या भागाला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असंदेखील म्हटलं जातं. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जात असतात. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या काळात जम्मू-काश्मीरमधील थंड वातावरणात जाण्याला पर्यटकांकडून प्राधान्य दिलं जातं. यंदाही मार्च-एप्रिलमध्ये काश्मीरमधील पर्यटनाच्या व्यवसायाला चांगली सुरुवात झाली होती. पण या हल्ल्यामुळे यंदाचा पर्यटनाचा हंगाम वेळेच्या खूप आधीच बंद झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिकांकडून दिली जात आहे.

हल्ला झाला तिथला सॅटेलाईट Video व्हायरल!

यंदाच्या याच हंगामासाठी पर्यटकांनी पहलगाममध्ये मोठी गर्दी केली होती. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. नेमका हल्ला कुठे झाला, याचा एक सॅटेलाईट व्हिडीओ पीटीआयनं शेअर केला आहे. त्यात या संपूर्ण भूभागाचा नेमका अंदाज येत आहे.

या व्हिडीओमध्ये सर्व बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेला एक मोकळा भूभाग दिसत आहे. यालाच पहलगामचं ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हटलं जातं या भूभागाच्या उत्तरेकडे एक निमुळता रस्ता जात असून पुढे तो बैसरण खोऱ्यात जाताना दिसत आहे. एखाद्या मोकळ्या पठारासारख्या दिसणाऱ्या या भागाच्या उजवीकडे काही निमुळत्या वाटा दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी पक्का रस्ता नसल्याचं या सॅटेलाईट व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

पक्क्या रस्त्याअभावी सुरक्षा पथकास पोहोचण्यास उशीर

दरम्यान, या परिसराकडे येण्यासाठी पक्का रस्ताच नसल्यामुळे इथे एकतर पायी किंवा खेचरावरूनच येता येणं शक्य आहे. त्यामुळे मूळ पहलगाम शहर ते बैसरण खोऱ्यापर्यंतचं सहा ते साडेसहा किलोमीटरचं अंतर पार करून येण्यासाठी पोलीस व सुरक्षा पथकाला बराच वेळ लागला. “पोलीस येण्याच्या खूप आधीच दहशतवादी गोळीबार करून निघूनही गेले होते”, अशी प्रतिक्रिया एका पर्यटक महिलेनं दिली आहे.

Pahalgam Terror Attack Live Updates : जम्मू काश्मीरमध्ये गोळीबार सुरूच, घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

भारताची ठोस पावलं, पाकिस्तानची नाकेबंदी

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंधू जल करार रद्द केल्याचं जाहीर केलं. त्याचप्रमाणे भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्यास बजावण्यात आलं आहे. पाकिस्तानमधील नागरिकांना भारतात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच, भारताच्या पाकिस्तानमधील दूतावासातील कर्मचाऱ्यांना तातडीने भारतात परतण्यास सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांनीही तातडीने परत यावं, असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.