माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने ‘पेड न्यूज’प्रकरणी पाच आरोप निश्चित केले. निवडणूक आयोगाकडे संपत्ती जाहीर करताना चुकीची माहिती दिल्याचा आरोपही त्यांच्यावर निश्चित करण्यात आला आहे. चव्हाण यांच्याविरोधातील हे आरोप सिद्ध झाल्यास त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाने चव्हाण यांना नोटीस पाठवली. २००९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान चव्हाण यांनी अनावश्यक खर्च केला होता. तो ‘पेड न्यूज’ या प्रकारात येत असल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगानेच याप्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
या प्रकरणाची सुनावणी ४ जून रोजी होणार असून, त्या दिवशी निवडणूक आयोगाच्या पथकासमोर चव्हाण यांच्याविरोधातील पुराव्यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्यासह निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा आणि एस. एन. ए. झैदी हे या पथकात आहेत. प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर ९ जून रोजी पुढील सुनावणी घेणार आहे.
आयोग काय पाहणार?
चव्हाण यांनी स्वत: ‘पेड न्यूज’ दिली किंवा त्यांच्या मार्फत अन्य व्यक्तीने दिली आहे, याची चौकशी आयोग करणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा-१९५१च्या कलम १०ए नुसार निवडणूक खर्च चुकीचा दाखविलेल्या व्यक्तीला निवडणुकीतून अपात्र ठरविता येते. चव्हाण यांनी या कायद्याविरोधात वर्तन केले आहे का, याची पाहणी आयोग करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paid news ec frames charges against ashok chavan