पाकिस्तानी लष्कराचा तेथील उद्योग जगतात असलेला सहभाग जगजाहीर असताना आता भारतीय वृत्तवाहिन्यांचा व इतर दूरचित्रवाणी वाहिन्यांचा मुकाबला करण्यासाठी आता लष्करानेच एखादी दूरचित्रवाणी वाहिनी ताब्यात घेऊन चालवावी, असे मत एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. पाकिस्तानी लष्करासाठीच्या शिफारशींचे जे ग्रीन बुक आहे त्यात ही शिफारस करण्यात आली आहे. त्यातून पाकिस्तानात अंतर्गत पातळीवर नेमकी काय व्यूहरचना चालते याचा थोडासा अंदाज येतो, असे ‘द न्यू डेली’ ने म्हटले आहे. कारगिलच्यावेळी भारतीय वाहिन्यांनी केलेल्या आक्रमणाचा प्रतिकार पाकिस्तान करू शकले नाही, त्यामुळे आता लष्करानेच दूरचित्रवाणी वाहिनी चालवायला घ्यावी, असे मत यात ग्रीन बुकमधील ‘सब कनव्हेन्शनल वॉरफेअर’ या प्रकरणात व्यक्त केले आहे. मेजर जनरल महंमद आझम आसीफ हे पाकिस्तानी पायदळाचे प्रमुख असून त्यांनी भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वृत्तपत्रांचा मुकाबला करण्यासाठी ही सूचनावजा शिफारस केल्याचे समजते. आसीफ यांनी केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आकाशवाणी, बीबीसी व भारतीय उपग्रह वाहिन्यांमुळे महत्त्वाच्या घटनांच्यावेळी कमी झाली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला नैतिक व मानसिकदृष्टीने पराभूत करण्याचे भारताचे लक्ष्य होते, असेही त्यांचे म्हणणे आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांची संख्या व माहिती तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे भारताने इलेक्ट्रॉनिक माध्यमात पाकिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमे व पाकिस्तानी लष्कर यांच्या प्रतिनिधींना एकत्र बसवून विचारमंथन घडवून आणावे, असे सांगून आसीफ यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत आपला देश आक्रमक मानसिकतेत येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य टिकवणे कठीण आहे. ग्रीन बुक हे दर दोन वर्षांनी पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाकडून प्रसिद्ध केले जाते, पण ते जनतेला उपलब्ध नसते. एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, ग्रीनबुकमधील मते ही लष्कराची मते असतातच असे नाही. अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्या व मुद्रित माध्यमे(वृत्तपत्रे, मासिके) पाकिस्तानात खुलेआम व छुपेपणाने अशा दोन्ही मार्गानी उपलब्ध असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय वाहिन्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धाच्यावेळी भारतीय जवानांच्या शौर्याचे सतत कौतुक केले, त्यामुळे पाकिस्तानी लष्कराचे मनोधैर्य खचून त्यांना पराभव पत्करावा लागला, असा दावाही करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा