रशियातील उफा येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेत मुंबई खटल्याच्या पाकिस्तानातील कामकाजास वेग देण्याचे आश्वासन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले असतानाच आता पाकिस्तान सरकारने लष्कर-ए-तोयबाचा कमांडर व मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झाकी उर रहमान याच्या आवाजाच्या नमुन्यासाठी न्यायालयात अर्ज करायचा नाही असा निर्णय घेतला आहे. फिर्यादी पक्षाचे प्रमुख चौधरी अझर यांनी रविवारी ही माहिती दिली.
लख्वीच्या आवाजाचे नमुने मिळण्याचा प्रश्न संपला आहे, कारण २०११ मध्ये आम्ही कनिष्ठ न्यायालयात लख्वीच्या आवाजाच्या नमुन्यासाठी अर्ज केला होता तो फेटाळून लावण्यात आला, कारण आरोपीचे आवाजाचे नमुने देण्याची परवानगी असलेला कुठलाही कायदा नाही, असे न्यायाधीश मलिक अक्रम अवान यांनी म्हटले होते. आता सरकार नव्याने कनिष्ठ न्यायालयात लख्वीच्या आवाजाचे नमुने मागण्यासाठी अर्ज करणार नाही. मुंबई हल्ल्याच्या खटल्यात फिर्यादी पक्षाचे काम पाहणाऱ्या वकिलांचे हे विधान म्हणजे पाकिस्तानला एकही पाऊल पुढे टाकण्याची इच्छा नाही हे स्पष्ट करणारे आहे.
चौधरी यांनी सांगितले, की पाकिस्तानात आरोपीच्या आवाजाचे नमुने देण्याबाबत परवानगी अदा करणारा कायदा नाही. भारत व अमेरिकेतही तसा कायदा नाही. पाकिस्तानी संसदेच्या माध्यमातून असा कायदा करता येऊ शकतो, पण ते अवघड आहे.
माहिती मंत्री परवेझ रशीद यांनीही संसदेत त्याबाबत प्रश्न मांडण्याबाबत काही हालचाली करण्याचे संकेत दिले नाहीत. त्यांनी सांगितले, की पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा खटला वेगाने चालवण्याचा प्रश्न संयुक्त निवेदनात समाविष्ट केला आहे, कारण भारत सज्जड पुरावे देईल अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या सरकारचा दहशतवादाच्या विरोधात लढण्याचा निर्धार कायम आहे. पाकिस्तानने मुंबई हल्ल्यातील सर्वावर खटले भरले आहेत, पण आम्हाला पुरावे हवेत. पुरावे देण्याची जबाबदारी भारताची आहे. भारताने अजून ठोस पुरावे दिलेले नाहीत. लख्वी याचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले, की २०११ मध्ये आवाजाच्या नमुन्यांची मागणी करण्यात आली होती, पण ती न्यायालयाने फेटाळली आहे. संसदेत कायदा केल्याशिवाय आमच्या अशिलाचे आवाजाचे नमुने मिळणार नाहीत. लख्वी याला १० एप्रिल रोजी तुरुंगातून सोडण्यात आले होते व त्याच्यासमवेतचे अब्दुल वाहिद, मझहर इक्बाल, हमद अमीन सादिक, शाहीद जमील रियाज, जमील अहमद, युनूस अंजुम यांना गेली सहा वर्षे अदियाला तुरुंगात ठेवले आहे. २००८ मध्ये मुंबईत करण्यात आलेल्या हल्ल्यात १६६ जण मरण पावले होते.

Story img Loader