लाहोर : पाकिस्तान संकटाच्या तोंडावर असून देशात पूर्वपाकिस्तानसारखी परिस्थिती उद्भवू शकते आणि देशाचे तुकडे होऊ शकतात असा इशारा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी दिला. दुसरीकडे इम्रान यांच्या घरात ३० ते ४० दहशतवादी लपले असल्याचा पंजाब सरकारचा दावा असून त्यांच्या घराला पंजाब प्रांताच्या पोलिसांनी घेराव घातला आहे. पोलीस कोणत्याही क्षणी कारवाई करू शकतात.
पाकिस्तानला वाचवण्यासाठी सध्याची राजकीय अस्थिरता संपुष्टात आणणे आवश्यक आहे, त्यासाठी तातडीने सार्वत्रिक निवडणूक घेणे हाच एकमेव उपाय असल्याचा दावा इम्रान यांनी केली. या वेळी ते म्हणाले की, राज्यघटनेचे पावित्र्य नष्ट होत आहे, देशाच्या संस्था नष्ट होत आहेत किंवा पाकिस्तानचे लष्कर बदनाम होत आहे याबद्दल पाकिस्तान डेमोक्रॅटिम मूव्हमेंटच्या नेत्यांना आणि लंडनमध्ये पलायन केलेल्या नवाज शरीफ यांना काहीही चिंता वाटत नाही अशी टीका इम्रान यांनी केली. या नेत्यांना फक्त लुटलेली संपत्ती सांभाळण्याचा स्वार्थ जपायचा आहे असा हल्लाबोल त्यांनी चढवला. आपल्या अटकेनंतर पाकिस्तानात उसळलेला हिंसाचार हा केवळ कट होता आणि सत्ताधारी आघाडी व पंजाबमधील काळजीवाहू सरकारनेच ही हिंसा घडवली असा आरोपही इम्रान यांनी या वेळी केला. इम्रान खान भाषण करत असताना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला होता.
इम्रान यांच्या घरात ४० दहशतवादी?
इम्रान खान यांच्या घरात ३० ते ४० दहशतवादी लपून बसले आहेत असे पंजाब सरकारचे म्हणणे असून त्यांना अटक करण्यासाठी पाकिस्तान पोलीस मोहीम हाती घेऊ शकतात असे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांनी दिले आहे. या दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी इम्रान यांना २४ तासांची मुदत देण्यात आली होती, ती उलटून गेली आहे. इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर नाकेबंदी करण्यात आली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इम्रान यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून कायदेशीर पद्धतीने आपल्या घराची तपासणी केली जाऊ शकते असे सांगितले आहे.