तेहरिके इन्साफचे प्रमुख इमरान खान आणि पाकिस्तान आवामी तेहरिक ताहिरुल कादरी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले आहे. दोन्ही नेत्यांच्या आडमुठय़ा धोरणांमुळे देशाचे चीनशी असलेले संबंध बिघडल्याचा आरोप सरकारने केला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटण्यास आणि विकासप्रक्रियेला खीळ घालण्यास इमरान खान आणि ताहिरूल कादरी यांनी केलेले आंदोलन जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तब्बल २० दिवसांहून अधिक काळ इस्लामाबाद शहरात ठिय्या मारून बसलेल्या आणि नंतर सरकारविरोधी आंदोलन तीव्र करणाऱ्या विरोधकांच्या कृतीमुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे अब्जावधी डॉलर पाण्यात गेले. त्यामुळे देशाच्या विकासाला खीळ बसली, असे असिफ यांनी स्पष् टष्ट केले.
परंतु देशांचे किती आर्थिक नुकसान झाले याची नेमकी आकडेवारी ख्वाजा असिफ देऊ शकले नाहीत; मात्र देशातील अनेक प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत, असे ते म्हणाले. चीनचे अध्यक्ष क्षि जिनपिंग यांची भेट आंदोलनामुळे रद्द करावी लागली. चीनसोबत आपला देश अब्जावधी डॉलरचा करार करणार होता. तो होऊ शकला नाही. याला दोन्ही नेते जबाबदार असल्याचे असिफ यांनी स्पष्ट केले. पुढील महिन्यात पाकिस्तानात १० हजार ४०० मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात सरकार चीनशी करार करणार आहे. यासाठी पाकिस्तान पंतप्रधान लवकरच चीनला जाणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
 

Story img Loader