सरबजित सिंग याच्या हत्येप्रकरणी पाकिस्तान सरकारच्या बेजबाबदारपणाबद्दल तेथील वृत्तपत्रांनी आगपाखड केली आहे. पाकिस्तानी तुरुंगात भारतीय कैद्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही याची जाणीव असतानादेखील पाक सरकारने सरबजित सिंग याला पुरेसे संरक्षण का दिले नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, त्यांचा पाकिस्तान सरकारने विचार करणे अपेक्षित आहे. देशातील सर्वच अग्रगण्य वृत्तपत्रांनी आपल्या अग्रलेखांमधून या बेजबाबदारपणासाठी सरकारलाच जबाबदार धरले आहे.
‘अनुकूल काळात निष्काळजी आणि प्रतिकूल काळात सारवासारव’ ही पाकिस्तानची जणू सवयच होऊ लागली आहे, अशा शब्दांत डॉन या वृत्तपत्राने टीका केली आहे. एकीकडे पाकिस्तानच्या तुरुंगांमधील कैद्यांच्या अवाजवी संख्येबाबत विचार करण्याची वेळ आली आहे हे सत्य आहेच, मात्र त्याच वेळी सरबजितसारख्या राजकीय आणि सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या विषयाचे गांभीर्य पाक सरकारच्या लक्षात कधी येणार, अशी विचारणाही पाक वृत्तपत्रांनी केली आहे.

Story img Loader