पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ यांनी दाढी राखली नसल्याचे कारण देत त्यांच्या उमेदवारीला पाकिस्तानातील दोघा नागरिकांनी औपचारिक आक्षेप घेतला आहे. दाढी राखणे हे उत्तम मुस्लीम नागरिक असल्याचे लक्षण असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.
शरीफ यांनी पंजाब असेंब्लीच्या दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या उमेदवारीला बादर अमीन आणि सईद इक्तिदार यांनी आक्षेप घेतला. अल्लाचे सर्व प्रेषित दाढी राखणारे आहेत तथापि शाहबाज शरीफ मुस्लीम असूनही ते इस्लामची शिकवण मानत नसल्याचे अमीन आणि इक्तिदार यांनी निर्वाचन अधिकाऱ्याला सांगितले.
पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे काम करताना शरीफ यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्याचप्रमाणे घटनेतील तरतुदींनुसारअसेंब्लीचे सदस्य होण्याचे निकषही त्यांनी पूर्ण केलेले नाहीत, असा दावाही या दोघांनी केला आहे. शरीफ यांनी आपली मालमत्ता आणि बँकेतून घेतलेल्या कर्जाचा तपशील दडवून ठेवला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आपल्या उमेदवारी अर्जात शरीफ यांनी राजकारण हा आपला व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे. मात्र राजकारण हा व्यवसाय नाही तर देशाची ती सेवा आहे, असा दावाही अमीन आणि इक्तिदार यांनी केला आहे. यावरून शरीफ हे अप्रामाणिक असल्याचे सिद्ध होते, त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळावा, अशी मागणीही त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा