एकीकडे संसदेवरील हल्ल्याच्या घटनेला शनिवारी १३ वर्षे पूर्ण होत असताना भारतीय संसद पाहण्यास आलेल्या पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दखल न घेतल्याचा आव आणून अक्षरश: उलटय़ा बोंबा मारल्या. गॅलरीत बसून कामकाज पाहिल्यानंतर महाजन यांनी आमची साधी दखलही घेतली नसल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या खासदारांनी दिली. त्यावरून प्रसारमाध्यमांनी एकच गहजब केला. प्रत्यक्षात खुद्द सुमित्रा महाजन निर्धारित एक वाजता पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाची वाट पाहत होत्या. दहा मिनिटे झाल्यानंतरही पाकिस्तानी खासदारांचे शिष्टमंडळ आले नाही. अखेरीस पाकिस्तानी खासदारांना निमंत्रण धाडणाऱ्या काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी आपण समन्वयात कमी पडल्याची कबुली दिली. त्यानंतर ही चर्चा थांबली.
पाकिस्तानच्या इन्स्टिटय़ूट ऑफ लेजिस्लेटर अॅण्ड ट्रान्सपरन्सीच्या वतीने सतरा पाकिस्तानी खासदारांचे शिष्टमंडळ भारतभेटीवर आले होते. संबंधित संस्था मणिशंकर अय्यर यांच्या संपर्कात होती. अय्यर यांनी पाकिस्तानी खासदारांसाठी यजमानपद भूषवले. पाकिस्तानी खासदार सभागृहात आल्याचे माहिती नसल्याची प्रतिक्रिया महाजन यांनी नोंदवल्याचा दावा करीत या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्षात दोन्ही देशांमध्ये या दौऱ्याची अधिकृत बोलणी झाली नव्हती. एका संस्थेच्या माध्यमातून भारतात आल्यामुळे या शिष्टमंडळाची दखल घेणे भारतावर बंधनकारक नव्हते. तरीही सुमित्रा महाजन यांनी सौजन्य दाखवून पाकिस्तानी शिष्टमंडळाला गॅलरीतून कामकाज पाहण्याची परवानगी दिली. ते कामकाज पाहून संसदेतून बाहेर पडताना पाकिस्तानी खासदारांनी धन्यवाद म्हणणे तर दूरच, उलट दखल घेतली नाही म्हणून नाराजीच व्यक्त केली.
संसदेवरील हल्ल्यास तेरा वर्षे पूर्ण होत असताना पूर्वसंध्येला संसदेत येणाऱ्या पाकिस्तानी खासदारांचे योग्य आदरातिथ्य भारताने केले. अखेरीस या प्रकरणी महाजन यांच्या कार्यालयाकडून अधिकृत खुलासा आल्यावर मणिशंकर अय्यर यांनी झाल्या प्रकरणाचे खापर स्वत:च्याच डोक्यावर फोडून घेतले. विशेष म्हणजे गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची पाठराखण करणारे भाजपचे साक्षी महाराज दिलगिरी व्यक्त करीत असताना पाकिस्तानी शिष्टमंडळ सभागृहात उपस्थित होते.
संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, ही अधिकृत भेट नव्हती. मी भारताचा मंत्री आहे. मला भारतीय संसदेची काळजी आहे. माझ्या लोकांची काळजी आहे. महाजन यांच्या कार्यालयाने पाकिस्तानी खासदारांच्या या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी सांगितले की, दोन देशांच्या समन्वयातून भेट झाल्यास तशी अधिकृत घोषणा सभागृहात करता येते. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून भारतात आलेल्या पाकिस्तानी खासदारांच्या उपस्थितीची माहिती सभागृहात देण्यात आली नाही. शिवाय लोकसभा अध्यक्षांना भेटण्यास ते वेळेवर उपस्थित नव्हते.

Story img Loader