पाकिस्तानच्या तुरुंगात जीवघेणा हल्ला करण्यात आलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याला उपचारांसाठी भारतात आणण्याच्या आशा सोमवारी संपुष्टात आल्या. सरबजित सिंगवर उपचार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य समितीने दिलेल्या अहवालात सरबजित सिंगला उपचारांसाठी परदेशी नेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. कोट लखपत तुरुंगात दोन कैद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सरबजित सिंग गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी भारतात पाठवावे, अशी विनंती त्याच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानकडे केली आहे. सरबजितच्या प्रकृतीत अद्यापही कोणती सुधारणा झालेली नाही. त्याच्या मेंदूला जबर मार लागला असून त्यामुळे त्याची प्रकृती ढासळली आहे. शुक्रवारपासून येथील जीना रुग्णालयामध्ये सरबजितवर उपचार सुरू आहेत. त्याला उपचारासाठी परदेशात पाठवावे की, परदेशातून वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्यावी याबाबत विचार करण्यासाठी सरकारने आरोग्य समिती नेमली होती.
डॉ. शौकत मेहमूद, प्रोफेसर अंजूम हबीब, प्रोफेसर जफर आणि प्रोफेसर नईम कसुरी यांच्या समितीने सोमवारी सकाळी अतिदक्षता विभागामध्ये सरबजितच्या प्रकृतीची पाहणी केली.  
विविध चाचण्यांद्वारे आलेल्या माहितीनंतर या समितीने बैठक घेऊन सरबजितला उपचारांसाठी परदेशी जाण्याची अथवा त्याच्या उपचारांसाठी परदेशातून वैद्यकीय तज्ज्ञ आणण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. सरबजित सिंग अद्याप कोमामध्ये असला, तरी त्याच्या नाडीचे ठोके, रक्तदाब सुरळीत आहे. लवकरच तो कोमामधून बाहेर येईल, असा विश्वास डॉक्टरांना असून, त्यानंतर त्याच्या मेंदूला झालेल्या जखमा भरून येतील, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

Story img Loader