प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना भाजपाने रविवारी निलंबित केलं आहे. यानंतरही मागील पाच ते सहा दिवसांपासून या प्रकरणवारुन मोठा वाद निर्माण झालाय. या प्रकरणावरुन इस्लामी देशांमध्येही तीव्र पडसाद उमटले आहेत. नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (१० जून २०२२ रोजी) नमाज पठणानंतर देशाबरोबरच महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनं केली. देशामध्येही या प्रकरणावरुन मुस्लिम समाजाकडून संताप व्यक्त होत असतानाच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही या वरुन नाराजी व्यक्त केलीय.
नक्की वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला आणि म्हणाले, बेटा…”; नुपूर शर्मांच्या मुलाखतीचा Video चर्चेत
शोएब अख्तरने ट्विटरवरुन एक पोस्ट करत या प्रकरणासंदर्भात उघडपणे आपली नाराजी व्यक्त करताना भारतात सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने यासंदर्भात केलेल्या कारवाईचं स्वागतही केलं आहे. “प्रेषित मोहम्मद यांचा मान आणि सन्मान आमच्यासाठी सर्व काही आहे. आमचं जगणं, मरणं आणि प्रत्येक गोष्टी ही फक्त त्यांच्यासाठी आहे,” असं म्हणत शोएबने या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा >> प्रेषित अवमान प्रकरण: “मोदींनी हे समजून घेण्याची गरज आहे की…”; भाजपाला लक्ष्य करत ओवेसींकडून नुपूर शर्मांच्या अटकेची मागणी
पुढे शोएब म्हणतो, “मी कठोर शब्दांमध्ये आमच्या प्रिय प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करतो. अशाप्रकारचं लज्जास्पद वर्तन करणाऱ्या दोषींना निलंबित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून या निर्णयाचं मी स्वागत करतो,” असं म्हटलंय. तसेच पुढे शोएबने, “भारत सरकारने यापुढे अशापद्धतीच्या गोष्टी होणार नाहीत यासंदर्भात काळजी घ्यावी,” अशीही अपेक्षा व्यक्त केलीय.
नक्की वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “नुपूर शर्माला फाशी द्या”; महाराष्ट्रातील नेत्याची केंद्राकडे मागणी
कतार, इराण, कुवेतपाठोपाठ आता संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांनाही या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. या देशांच्या सहभागामुळे या प्रकरणावरुन भारताचा विरोध करणाऱ्या देशांची संख्या १२ वर पोहोचली आहे. यामध्ये सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, जॉर्डन, ओमान, पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे.