पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे तीन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. नुकतेच ते मायदेशामध्ये परतले. मात्र हा दौरा कशासाठी आयोजित करण्यात आला होता यावरुन विरोधी पक्षांबरोबरच पाकिस्तानमधील जनताही प्रश्न उपस्थित करत आहेत. सौदी अरेबियाने पाकिस्तानी पंतप्रधानांना भेट म्हणून तब्बल १९ हजार ३२ पोती तांदूळ दिले आहेत. पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने याच मुद्द्यावरुन इम्रान यांच्यावर निशाणा साधला आहे. हा पाकिस्तानचा अपमान असल्याचं विरोधी पक्षाने म्हटलं आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी, जेवढ्या किंमतीचे तांदुळ पंतप्रधानांनी देशात आणलेत त्याहून अधिक पैसे तर त्यांनी आपल्या या दौऱ्यावर खर्च केलेत, असा टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इम्रान यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये १२ मंत्री आणि सहकारी त्यांच्यासोबत होते. हा दौरा पाकिस्तानसाठी फार फायद्याचा ठरल्याचा दावा केला होता. भुट्टो यांनी सौदी अरेबियाने दान देण्याच्या वेळावरुनही शंका उपस्थित केली आहे. सौदीने पाकिस्तानला केलेली मदत ही जकातच्या स्वरुपात दिली आहे. इम्रान खान मागील हाच दिवस पाहण्यासाठी २२ वर्षांपासून राजकारणाच्या क्षेत्रात आहेत का असा प्रश्नही भुट्टो यांनी विचारला आहे. रमजानच्या महिन्यामध्ये सामान्यपणे चांगल्या कामासाठी जो निधी गोळा किंवा दान केला जातो त्याला मुस्लीम धर्मीय लोकं जकात असं म्हणतात. अण्वस्त्रे असणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशाने अशापद्धतीची मदत घेताना विचार करायला हवं होतं, असंही भुट्टो यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षाने टीका केल्यानंतर इम्रान खान सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचं चित्र दिसत आहे. इम्रान यांचे विशेष सल्लागार असणाऱ्या ताहिर अशरफी यांनी पाकिस्तानने यापूर्वीही गरीबांसाठी अशाप्रकारची मदत सौदीकडून घेतली असल्याची आठवण करुन दिली. पाकिस्तानला तांदळाची गोणी देण्याचा निर्णय सौदीने महिन्याभरापूर्वीच घेतला होता. इम्रान यांनी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान सौदीचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. दोघांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak pm imran khan brings 19032 bags of rice as gift from saudi arabia scsg