पाकिस्तानचे पंतप्रधान रझा परवेझ अश्रफ हे शनिवारी भारतात येत असून ते अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दग्र्याला भेट देणार आहेत. तथापि, त्यांच्या अधिकृत भेटीचा कोणताही कार्यक्रम अद्याप ठरविण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तान सरकारची मुदत येत्या १६ मार्च रोजी संपुष्टात येणार असल्याने रझा अश्रफ यांची ही बहुधा अखेरची परदेशवारी ठरण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान अश्रफ यांची कोणत्याही भारतीय नेत्यासमवेत अद्याप बैठक निश्चित करण्यात आलेली नाही.
पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांनी गेल्या एप्रिल महिन्यात अजमेरला भेट देऊन दग्र्यावर प्रार्थना केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी दर्गा व्यवस्थापनाला एक दशलक्ष डॉलरची देणगीही दिली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमवेत भोजनही घेतले होते.
दग्र्यावरील पीर बिलाल चिश्ती यांच्याशी अश्रफ यांचे चांगले संबंध आहेत. गेल्या वर्षी चिश्ती यांनी इस्लामाबादमध्ये दोनदा अश्रफ यांची भेट घेतली होती. त्या वेळी चिश्ती यांनी अश्रफ यांना अजमेर भेटीचे निमंत्रण दिले होते.
शिवसेनेचा विरोध
नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानाचा शिरच्छेद केला ते शिर परत आणल्यासच पाकिस्तान पंतप्रधानांना भारतभेटीची परवानगी द्यावी, असे स्पष्ट करून शिवसेनेने अश्रफ यांच्या प्रस्तावित भारतभेटीला तीव्र विरोध दर्शविला आहे. अश्रफ यांच्यासाठी सरकारने पायघडय़ा घालू नयेत, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.