पाकिस्तानचा दावा
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदच्या जमात उद दवा संघटनेवर बंदी घालण्यास पाकिस्तान सरकारने नकार दिला आहे. जमात उद दवा संघटनेचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी अथवा लष्कर ए तोयबाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे त्यावर बंदी घालणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. जमात उद दवा म्हणजे लष्कर ए तोयबाची नवी आवृत्ती असल्याचे भारतासह संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे असले तरी त्यासंबंधीचे कोणतेही पुरावे पाकिस्तानला सुपूर्त केले नाही, असे पाकिस्तानचे राज्यमंत्री आणि माजी लष्करी अधिकारी अब्दुल कादिर बलोच यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, जमात-उद-दवा संस्था समाजकार्याचे काम करत असल्याचा दावा देखील बलोच यांनी केला आहे.
दहशतवाद विरोधी कायद्यानुसार सेक्शन ११डी अंतर्गत १५ नोव्हेंबर २००३ सालापासून जमात उद दवावर सरकारचे लक्ष आहे. संघटना कोणत्याही दहशतवादी कृत्याशी संलग्न असल्याचे आढळून आल्यास तिच्यावर तात्काळ बंदी घालण्यात येईल अशी तरतूद या कायद्यामध्ये असल्याचे बलोच यांनी यावेळी सांगितले. मात्र, जमात उद दवा समाजकार्य, धर्मादाय, रुग्णालयांचे व्यवस्थापन, शाळा, रुग्णवाहिनी सेवा या समाजिक कार्यात गुंतलेली संस्था असल्याचा दावाही बलोच यांनी केला.
दहशतवादी हाफिज सईदची संघटना ‘समाजसेवी’!
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदच्या जमात उद दवा संघटनेवर बंदी घालण्यास पाकिस्तान सरकारने नकार दिला आहे.
First published on: 08-07-2015 at 06:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak says wont ban mumbai attack mastermind hafiz saeed jamaat ud dawah