आपल्या बँक खात्यातून १७ लाख रुपयांची रोख रक्कम काढून ती बँकेच्या शाखेसमोरच जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात घडला आहे. नाहीद (४०) आणि रुबिना (३५) या दोन बहिणींनी हे धक्कादायक कृत्य केले.
झेलमच्या बिलाल शहर परिसरात राहणाऱ्या या दोघी बहिणी तीन दिवसांपूर्वी नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानच्या चक नासा शाखेत गेल्या आणि त्यांनी मुदत ठेवीच्या खात्यातील १.७ दशलक्ष रुपये काढण्याची इच्छा व्यक्त केली. तथापि, त्यांची ही मागणी तातडीने पूर्ण करता येणे शक्य नसल्याचे बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने त्यांना सांगितले.
त्यामुळे या बहिणी गुरुवारी पुन्हा त्या शाखेत गेल्या आणि त्यांनी पैशांची मागणी केली. दुपापर्यंत त्या बहिणींकडे रक्कम सुपूर्द करण्यात आली. या चलनी नोटा घेऊन त्या बँकेच्या शाखेबाहेर आल्या आणि त्यांनी त्या नोटा चक्क जाळल्या, असे पोलिसांनी सांगितले.
सदर दोघी जणी चलनी नोटा जाळून टाकत असल्याचा प्रकार बघून हबकलेल्या दुकानदाराने आणि एका पादचाऱ्याने त्यांना नोटा जाळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नाहीदने आपल्याजवळील पिस्तूल काढले. आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे, असे तिने धमकावले.
हा प्रकार पाहून आतापर्यंत तेथे जमाव गोळा झाला, परंतु चलनी नोटा जळत असल्याचे पाहण्याशिवाय ते काहीही करू शकले नाहीत. या घटनेची खबर मिळाल्यानंतर तेथे पोलीस आले आणि त्यांनी जळलेल्या नोटांची राख गोळा केली.
गेल्या वर्षी या बहिणींनी वडिलोपार्जित मालमत्ता विकून २८ लाख रुपये बँकेत भरले होते. राजा मोहम्मद इक्बाल असे या बहिणींच्या वडिलांचे नाव असून ते काही वर्षांपूर्वी मारले गेले. त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायमच आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या बहिणी अविवाहित असून त्यांनी आपल्या दोघा भावांशीही फारकत घेतली आहे. या सर्व भावंडांना मानसिक विकार असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader