पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू आणि काश्मीर या दरम्यान सुरू करण्यात आलेली ‘कारवाँ-ए-अमन’ ही बससेवा खंडित करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून प्रवास करण्याच्या प्रक्रियेला धक्का बसला आहे.सोमवारी ही बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार नाही. चाकण-दा-बाग (जम्मू-काश्मीर) आणि रावळकोटे (पाकव्याप्त काश्मीर) या दरम्यानची सेवा पाकिस्तानने खंडित केल्याचे व्यापारविषयक सुविधा अधिकारी अब्दुल हमीद शेख यांनी सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील बससेवा अथवा व्यापार पुन्हा कधी सुरू करण्यात येणार आहे, त्याचे वेळापत्रक कळविण्यात आलेले नाही. मात्र सोमवारी ही बससेवा सुरू नसेल, असे शेख म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील व्यापार आणि पर्यटन महासंचालकांशी आपण या बाबत संपर्क साधला. मात्र गोळीबाराच्या घटना सुरू असल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत सेवा सुरू करता येणार नाही, असे त्यांनी सांगितल्याचे शेख म्हणाले.
चाकण-दा-बाग येथील फाटक उघडण्यास पाकिस्तान लष्कराने नकार दिला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भाजीपाला पाठविण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधून २५ ट्रक पाठविण्यात आले होते, ते चेकपोस्टजवळच अडकून पडले आहेत.