मुलीच्या शिक्षणासाठी लढणारी मलाला युसुफझाई हिला नोबेल पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पाकिस्तान तालिबानच्या फुटीर गटाने थयथयाट केला आहे. मलाला युसुफझाई ही नास्तिकांची हस्तक असल्याचे या गटाने म्हटले आहे.
प्रसिद्धीसाठी काही नास्तिक मलालाचा वापर करीत आहेत असे तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडलेल्या जमात-ऊल-अहरार या गटाने ट्विट केले आहे. सशस्त्र उठाव आणि बंदुकांच्या विरोधात मलालाने आतापर्यंत अनेक वक्तव्ये केली. मात्र नोबेल पुरस्काराचा संस्थापक हा स्फोटकांचा जनक आहे याची मलालास जाणीव आहे का, असा सवालही एहसानउल्लाह एहसान याने ट्विटरवर केला आहे. जमात-ऊल-अहरार या गटावर ओमर खलिद खुरासनी याचे वर्चस्व असून त्याचा सुरक्षा यंत्रणांवर झालेल्या विविध हल्ल्यांमध्ये हात आहे. आतापर्यंत तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा नेता मुल्लाह फझलुल्लाह याने मलालास नोबेल मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Story img Loader