भाताबरोबरचे सर्व उभयपक्षी प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यावर आमचा भर राहील, असे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान नवाज़्‍ा शरीफ यांनी भारताचे उच्चायुक्त शरत् सबरवाल यांच्याशी शुक्रवारी झालेल्या भेटीत सांगितले. पाकिस्तानात ११ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज़्‍ा गट) हा पक्ष विजयी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर उच्चायुक्त सबरवाल यांनी प्रथमच शरीफ यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. शरीफ यांच्या लाहोरमधील रायविंड भागातील निवासस्थानी ही भेट झाली.
उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी कशाप्रकारे सकारात्मक पावले उचलता येतील, याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज़्‍ा गट) पक्षाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या बैठकीच्या वेळी पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार शाहबाज़्‍ा शरीफ आणि शरीफ मंत्रिमंडळात ज्यांच्याकडे अर्थमंत्रीपद जाण्याची चिन्हे आहेत ते इशाक दार हे नेतेही सहभागी झाले होते. त्यामुळे सबरवाल यांच्या भेटीस शरीफ यांनी महत्त्व दिले आणि त्यात गांभिर्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
भारत आणि पाकिस्तानात शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी जी प्रक्रिया सुरू झाली होती ती तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यामुळे खंडित झाली होती. ती पुन्हा पूर्ववत करण्यास आपण अत्यंत उत्सुक आहोत, असे शरीफ यांनी सबरवाल यांना सांगितले.
 विशेष म्हणजे, भारताबरोबर संबंध सुधारताना अतिउत्साहीपणा टाळा, असा सल्ला पाकिस्तानचे लष्करप्रमुख अश्फाक कयानी यांनी नुकताच दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर सबरवाल यांच्या भेटीत शरीफ यांनी उभय देशांतील संबंध सलोख्याचे व्हावेत यासाठी आपली मनोकामना उघडपणे व्यक्त केल्याने लष्करप्रमुखांना न जुमानता लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार भारताशी चर्चा करील, असे संकेत शरीफ यांनी जाणीवपूर्वक दिल्याची चर्चा आहे.
महिलेला अटक
दरम्यान, सीमा सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या साम्बा क्षेत्रात पाकिस्तानी हद्दीतून घुसलेल्या रशीदा बेगम या पाकिस्तानी महिलेस शुक्रवारी अटक केली. आपण चुकून भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे या महिलेने सांगितले असून प्राथमिक चौकशीत त्यात तथ्य आढळले आहे. त्यामुळे तिला पाकिस्तानी सैनिकांच्या हवाली केले जाईल, असे दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.