भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा पाकिस्तानातील चौघांचा प्रयत्न लष्कराने उधळून लावल्यानंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अंदाधूंद गोळीबार केला. भारतीय लष्कराचे प्रवक्ते एस. एन. आचार्य यांनी याबाबत माहिती दिली. 
पाकव्याप्त काश्मीरमधून सशस्त्र चौघेजण कृष्णाघाटी परिसरात भारतीय हद्दीत घुसखोरी करीत असल्याचे सीमेवरील लष्करी जवानांच्या लक्षात आले. घुसखोरी रोखण्यासाठी बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्या चौघांच्या दिशेने लष्कराने गोळीबार केला. त्यानंतर ते चौघेही पुन्हा माघारी फिरले. घुसखोरीचा बेत फसल्याचे लक्षात आल्यावर पाकिस्तानी जवानांनी भारताच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. पूंछ विभागातील कृष्णा घाटी, मंडी आणि चाकण दा बाघ परिसरात हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबारात कोणीही जखमी झालेले नसल्याचे आचार्य यांनी सांगितले.

Story img Loader