रविवारच्या सामूहिक प्रार्थनेसाठी लोकांचा ओघ सुरू असतानाच पेशावरमधील कोहाटी गेट येथील चर्चवर दोन तालिबानी आत्मघाती अतिरेक्यांनी चढविलेल्या हल्ल्यात तब्बल ७८ जण ठार तर १३० जण जखमी झाले. मृतांमध्ये ३० महिला आणि सात मुलांचा समावेश आहे. हल्ला झाला तेव्हा चर्चमध्ये सुमारे ७०० भाविक होते.
अर्ध्या सेकंदाच्या फरकाने दोन अतिरेक्यांनी हे हल्ले केले. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याच्या निषेधात हे हल्ले चढविल्याची घोषणा तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या जंदुल्ला गटाने केली आहे. ड्रोन हल्ले थांबत नाहीत तोवर असे हल्ले चढविण्याचा इशाराही या गटाने दिला आहे. पेशावरमध्ये आपत्कालीन आणीबाणी जाहीर करण्यात आली असून पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
या दोन आत्मघाती हल्लेखोरांकडे प्रत्येकी सहा किलो स्फोटके होती, असे बॉम्बनिकामी पथकाचे प्रमुख शफाकत महमूद यांनी सांगितले. पोलिसांना आत्मघाती हल्लेखोरांची मुंडकी सापडली असून, त्यानुसार त्यांची रेखाचित्रे तयार केली जातील, असेही ते म्हणाले.
इस्लामी वास्तुकलेनुसार बांधलेले ऑल सेंटस चर्च हे पेशावरमधील सर्वात जुने चर्च. ते १८८३ साली बांधले गेले होते. या चर्चवरील हल्ला हा ख्रिस्ती समाजाविरोधातला पाकिस्तानातील सर्वात मोठा हल्ला आहे.
सोमालियातील इस्लामी दहशतवाद्यांनी शनिवारपासून केनियाच्या नैरोबी येथील मॉलमध्ये सुरू केलेल्या धुमश्चक्रीत आतापर्यंत श्रीधर नटराजन (वय ४०) आणि परांशु जैन (वय ८) या दोन भारतीयांसह ५९ जण ठार झाले असून दहशतवाद्यांच्या तावडीतून ३० नागरिकांना वाचविण्यासाठी केनियाच्या सैनिकांबरोबर इस्रायलचे सैनिकही सरसावले आहेत.
या हल्ल्यात केनियाच्या अध्यक्षांचा एक आप्तही ठार झाला आहे. सोमालियातील दहशतवादविरोधी लढय़ात केनिया सहभागी झाल्याबद्दल अल-कायदाशी संबंधित अल-शबाब या अतिरेकी गटाने वेस्टगेट सेंटर या चारमजली मॉलवर हा हल्ला चढविला आहे. केनियाच्या गृहमंत्र्यांनी मॉलमध्ये १५ अतिरेकी घुसल्याचा दावा केला आहे तर, आपण चारच अतिरेक्यांना पाहिल्याचे हल्ल्यातून बचावलेल्यांनी सांगितले. या हल्ल्यात चार भारतीयांसह २०० जण जखमी झाले आहेत. सुमारे हजार नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे. अल कायदाने नैरोबीतील अमेरिकन दूतावासावर १९९८ मध्ये चढविलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
२००७मध्ये उघडलेल्या या मॉलमध्ये इस्रायलच्या अनेक विक्रेत्यांची दुकाने आहेत. येथील कॅफेमध्ये विविध देशांच्या अधिकाऱ्यांची नेहमीच ये-जा असल्याने हे मॉल अतिरेक्यांच्या रडारवर होतेच.

Story img Loader