Effects Of Pakistan Airspace Closure On India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहे. यानंतर गुरुवारी पाकिस्ताननेही भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा आता जास्त वेळ आणि आणि इंधन खर्च होणार आहे. त्यामुळे विमान प्रवासाचे भाडे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्ली विमानतळावरून निघणाऱ्या असंख्य आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या उड्डाण मार्गांचा इंडियन एक्सप्रेसने आढावा घेतला आहे. यातून असे दिसून आले की, पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचा परिणाम मध्य आशिया, काकेशस, पश्चिम आशिया, युरोप, यूके आणि उत्तर अमेरिकेतील भारतीय विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर होणार आहे.

विमान प्रवास महागण्याची शक्यता

विमान उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, पाकिस्तानच्या या निर्णयाचे काय परिणामांचे होतील याचा अंदाज इतक्या लवकर लावणे योग्य ठरणार नाही. असे तरी, यामुळे विमान कंपन्यांचे खर्च वाढण्याची शक्यता आहे. परिणामी विमान प्रवास भाडे वाढू शकते. याव्यतिरिक्त, इतर देशांच्या विमान कंपन्या पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास बंदी नसल्याने, त्यांच्या या मार्गांवरील उड्डाणांचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे.

भारतीय कंपन्यांचे २०१९ मध्ये ७०० कोटींचे नुकसान

यापूर्वी २०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने शेवटच्या वेळी दीर्घ कालावधीसाठी आपली हवाई हद्द भारतासाठी बंद केली होती. त्यावेळी दूरचा मार्ग आणि वाढलेल्या इंधन खर्चामुळे भारतीय विमान कंपन्यांना सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

एअर इंडियाकडून दिलगिरी

“सर्व भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राच्या निर्बंधांच्या घोषणांमुळे, उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेला जाणारी किंवा येथून येणारी काही एअर इंडियाची उड्डाणे पर्यायी आणि लांबच्या मार्गाने जातील अशी अपेक्षा आहे. आमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या या अनपेक्षित हवाई हद्द बंदीमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडिया दिलगीर आहे”, अशी पोस्ट टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने एक्सवर केली आहे.

प्रावस लांबणार

पाकिस्तानच्या या निर्णयाचे काय आर्थिक परिणाम होतील याबद्दल भारतीय विमान कंपन्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्ली, लखनौ आणि अमृतसरसह उत्तर भारतातील विमानतळांवरून उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्यांना आता गुजरात किंवा महाराष्ट्राला वळसा घालावा लागेल आणि नंतर युरोप, उत्तर अमेरिका किंवा पश्चिम आशियात जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागेल.

अनेक विमान कंपन्यांचा पाकिस्तानच्या हद्दीतून प्रवास

पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांना हवाई हद्द बंद केल्यानंतर होणाऱ्या परिणामांचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान सर्व प्रमुख भारतीय विमान कंपन्या देशाच्या पश्चिमेकडील देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवतात आणि यापैकी अनेक उड्डाणे नियमितपणे पाकिस्तानच्या हद्दीतून प्रवास करतात.