पेशावर : पाकिस्तानने पूर्व अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये ४६ जण ठार झाल्याचे तेथील तालिबान सरकारने बुधवारी सांगितले. पाकिस्तानने महिला आणि मुलांसह नागरिकांना लक्ष्य केल्याचे अफगाणिस्तान सरकारचे उपप्रवक्ता हमदुल्ला फितरत यांनी सांगितले. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अफगाणिस्तानसाठी विशेष प्रतिनिधींनी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अफगाणिस्तान दौरा केल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने हा हल्ला केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी रात्री उशिरा झालेली ही कारवाई अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजदूतांना बोलावून तीव्र निषेध नोंदवला. पाकिस्तान सरकारचे प्रतिनिधी अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना पाकिस्तानच्या लष्कराने दोन्ही देशांदरम्यान गैरसमज निर्माण करण्यासाठी हा हल्ला घडवला असे निवेदन अफगाणिस्तानच्या सरकारने प्रसृत केले.

हेही वाचा >>> प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा

अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ता फितरत म्हणाले की, पाकतिका प्रदेशातील बरमल जिल्ह्यातील चार ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. त्यामध्ये नागरिक मारले गेलेले नागरिक निर्वासित होते. त्यांच्याशिवाय सहा अन्य जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, बुधवारी सकाळी मोहम्मद खुरासानी या तेहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) प्रवक्त्याने केलेल्या दाव्यानुसार २७ महिला व मुलांसह ५० जण मारले गेले आहेत. मारले गेलेले पाकिस्तानातून अफगाणिस्तानात पळून आलेले निशस्त्र निर्वासित होते असे त्याने सांगितले. पाकिस्तान तालिबान ही स्वतंत्र दहशतवादी संघटना असली, तरी अफगाणिस्तानमधील तालिबानबरोबर तिचा संबंध आहे.

१३ घुसखोर ठार पाकिस्तान

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आरोपांवर उत्तर दिलेले नाही. मात्र, आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दक्षिण वजिरिस्तानमध्ये केलेल्या कारवाईत १३ घुसखोर ठार झाल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने जाहीर केले. दक्षिण वजिरिस्तान हा जिल्हा पाकतिका प्रदेशाला लागून आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वींनी एक निवेदन प्रसृत करून पाकिस्तानच्या शूर सुरक्षा दलांचे कौतुक केले.अफगाणिस्तान अशा प्रकारे आमच्या प्रदेशातील घुसखोरी कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही आणि आम्ही आमच्या देशाचे स्वातंत्र्य आणि भूप्रदेश यांचे संरक्षण करण्यासाठी तयार आहोत. अशा बेजबाबदार कृतींचे नक्कीच परिणाम होतील. – अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालय

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan airstrikes in paktika kill 46 people zws