कसाबबाबत प्रतिक्रियेस नकार
मात्र, दहशतवादविरोधी कारवाईचे समर्थन
अतिरेकी अज़मल कसाब याच्या फाशीबाबत पाकिस्तानने अत्यंत सावध पवित्रा घेतला असून भारताने त्याची आपणास पूर्वकल्पना दिल्याचे नमूद केले आहे. दहशतवादाचे निर्मूलन करण्याच्या सर्वच प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे आणि राहील, या शब्दांत कसाबची फाशी ही दहशतवादविरोधी कारवाई असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रप्रवक्ते मोअझ्झम खान यांनी बुधवारी सांगितले.
कोणत्याही स्वरूपात प्रकट होणाऱ्या आणि वावरणाऱ्या दहशतवादाविरोधात पाकिस्तानने नेहमीच खंबीर भूमिका घेतली आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटण करण्यासाठी उपखंडातील सर्वच देशांशी सहकार्य करण्याची आमची इच्छा आहे, असे मोअझ्झम खान यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कसाबच्या फाशीबाबत पाकिस्तानला एका पत्राद्वारे पूर्वकल्पना दिली गेली पण पाकिस्तानने कसाब आपला असल्याचे नाकारत ते पत्र स्वीकारले नाही. नंतर फॅक्सद्वारे ते पाठविले गेले, असा आरोप आहे. तो फेटाळताना खान म्हणाले की, मंगळवारी सायंकाळीच भारतीय उप उच्चायुक्तांनी आमच्या परराष्ट्र मंत्रालयास कसाबच्या फाशीची माहिती देणारे पत्र दिले आणि परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आशिया विषयक विभागाच्या महासंचालकांनी ते स्वीकारले होते.
पाकिस्तानातील लष्कर ए तय्यबा या अतिरेकी संघटनेने कसाबसह दहा अतिरेक्यांना मुंबईत चार वर्षांपूर्वी पाठविले होते. त्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत कसाब वगळता सर्वच अतिरेकी मारले गेले होते. कसाबला जिवंत पकडण्यात यश आले होते. या हल्ल्याच्या कटाची आखणी व कार्यवाही केल्याबद्दल लष्कर ए तय्यबाचा स्वयंघोषित कमांडर झाकिर उर रहमान लखवी आणि अन्य सहा अतिरेक्यांवर पाकिस्तानात खटला सुरू आहे मात्र तो वर्षभर रखडला आहे. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर ए तयबाचा संस्थापक हाफिज़्ा महम्मद सईद याच्यावर कारवाई करण्याची भारताची मागणी मात्र पाकिस्तानने धुडकावली आहे. भारताने पुरेसे पुरावे न दिल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर ए तयबाचा संस्थापक हाफिज़्ा महम्मद सईद याच्यावर कारवाई करण्याची भारताची मागणी मात्र पाकिस्तानने धुडकावली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा