येथील फावरा चौकाचे भगतसिंग चौक असे नामकरण करण्याच्या निर्णयाला लाहोर उच्च न्यायालयावे तीन आठवडय़ांची स्थगिती दिली आहे. लाहोर उच्च न्यायालयाचे न्या. नसीर सईद शेख यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी पंजाब सरकार आणि लाहोर जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही उत्तर दाखल करण्यात आले नसल्यामुळे या नामकरणास तीन आठवडय़ांची स्थगिती देण्याचा निर्णय शेख यांच्या खंडपीठाने सुनावला.
फावरा चौकास शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याच्या निर्णयास जमात-उद-दावाहशी या कडव्या संघटनेशी संलग्न असलेल्या तहरीक-ए-हुरमत-ए-रसूल या संघटनेने विरोध केला आहे. रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेने आर्थिक मदत केल्यामुळेच या चौकास भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याचा जावईशोध संघटनेचे नेते झहीद बट्ट यांनी लावला आहे.
दरम्यान फावरा चौकाचे भगतसिंग चौक असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी लाहोर उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तैमूर रेहमान आणि सईदा दीप या सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे.
 या चौकाला भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय देशविरोधी असल्याचा दावा  तहरीक-ए-हुरमत-ए-रसूल या संघटनेने केला होता. या दाव्यास या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. फावरा चौकाला भगतसिंग यांचे नाव देणे ही देशभक्तीची सर्वोच्च कृती आहे. भगतसिंग हे एक अधार्मिक व्यक्ती होते आणि त्यांनी भारतीय उपखंडाला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लढा दिला. ब्रिटिश साम्राज्याविरोधात मुस्लिमांसह सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठी भगतसिंग यांनी प्रयत्न केले. फावरा चौकाचे भगतसिंग चौक असे नामकरण करण्याचा लाहोर प्रशासनाचा निर्णय हा कायदेशीर असून यामध्ये कोणतीही देशविरोधी किंवा घटनाविरोधी कृती नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.