प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीच्या घटना संपत नसल्याबद्दल पाकिस्ताननेही आता नाराजी व्यक्त केली आहे. अशा घटनांमध्ये खंड पडत नसल्याबद्दल भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे आपली नाराजी दर्शविल्यानंतर पाकिस्तानने असा सभ्यपणाचा आव आणला आहे.
शस्त्रसंधीचा भंग आपल्याकडून होत असल्याच्या आरोपाचा पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते एझाझ चौधरी यांनी इन्कार केला. उभय देशांच्या पंतप्रधानांची बैठक होऊनही अशा घटना थांबत नसल्याबद्दल आम्हीही नाराज झालो आहोत, असे चौधरी म्हणाले. नवाझ शरीफ हे अमेरिकेत असताना आंतरराष्ट्रीय सीमेजवळ तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक असलेल्या पाकिस्तानच्या २७ चौक्यांवर भारतीय फौजांनी हल्ला चढविला आणि नवाझ शरीफ हे अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटण्याच्या तयारीत असताना नेमकी तीच वेळ अशा हल्ल्यांसाठी निवडण्यात आली, हे अत्यंत दुर्दैवी होते, असे चौधरी यांनी नमूद केले. पाकिस्तानी सैनिक भारतीय सैन्य तसेच नागरिकांवर हल्ले चढवीत असल्याच्या आरोपाबद्दल बोलताना प्रथम गोळीबार न करण्याचे धोरण पाकिस्तानचे सैनिक राबवीत आहेत. त्यांच्याप्रति गोळीबार झाला तर त्यास ते प्रत्युत्तर देतात, असे स्पष्टीकरण चौधरी यांनी दिले.