भारत आणि पाकिस्तानने परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज असून आपल्या प्रांतातील सुरक्षा आणि स्थैर्यासाठी भूतकाळातील घटना विसरल्या पाहिजेत, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानने आपल्या सर्व शेजारी देशांसमवेत नवा अध्याय सुरू करण्याचे ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून भारत आणि अफगाणिस्तानशी संपर्क साधला आहे. मात्र या प्रांतातील देश दुर्दैवाने अद्याप एकत्रित आलेले नाहीत. दोन मोठय़ा देशांनी आवश्यक त्या पातळीवर अद्याप परस्पर विश्वासाचे नाते जोडलेले नाही. दोन्ही देशांनी भूतकाळ विसरून भविष्याकडे पाहण्याची गरज आहे, असेही शरीफ म्हणाले.
पाकिस्तानातील जनतेला देशात आणि शेजारी देशांसमवेत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यात स्वारस्य आहे. जनतेला सुरक्षा आणि स्थैर्य हवे आहे. भारत आणि चीनमधील बाजारपेठांपाठोपाठ पाकिस्तान असून त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला लाभ होईल, असेही ते म्हणाले.
नव्या लष्करप्रमुखांकडून नियंत्रण रेषेवर पाहणी
पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट देऊन तेथील सैनिकांशी चर्चा केली. सीमेवरील याच ठिकाणी अलीकडेच मोठी धुमश्चक्री झाली होती. लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा