भारतीय सैन्याने भारत-पाकिस्तान सीमेवर पकडलेल्या दहशतवाद्यानं दिलेल्या माहितीमुळे पाकिस्तानच्या सैन्याचा आणि गुप्तचर संस्था आयएसआयचा (ISI) पर्दाफाश झालाय. यात लष्कर ए तोयबाचा सदस्य असलेल्या १९ वर्षीय अली बाबर पत्रा या दहशतवाद्याने पाकिस्तानी सैन्याने आईच्या उपचारासाठी पैशांचं अमिष दाखवून कसं दहशतवादाच्या मार्गावर आणलं याची माहिती दिली. तसेच काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचं सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात काश्मीरमध्ये लोक आनंदी असल्याचं दिसल्याचंही त्याने नमूद केलं.

अली बाबर पत्रा म्हणाला, “मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन आयएसायकडे सोपवलं होतं. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीशिवाय कुणीही भारतात घुसखोरी करू शकत नाही. मी लष्कर-ए-तोयबात सहभागी झाल्यानंतर मला २० हजार रुपये देण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्यानं प्रशिक्षण दिलेल्या इतर तरुणांसह मला आयएसआयकडे पाठवण्यात आलं. मला काश्मीरमध्ये पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबाला ३० हजार रुपये देण्यात येणार होते.”

“काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचं सांगितलं, पण ते तर आनंदी दिसले”

“काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र मला तसं काहीच दिसलं नाही. भारतीय सैन्यानं मला चांगली वागणूक दिली. मला मारहाण झाली नाही किंवा छळही झाला नाही. मला इथं जे लोक दिसले ते आनंदी दिसले. पाकिस्तानमधील माझ्यासारख्या तरुणांना मला सांगायचं आहे की जिहाद वाईट आहे,” असंही अली बाबर पत्राने नमूद केलं.

पाकिस्तानी सैन्याकडून तरुणांना पैशांचं अमिष दाखवून दहशतवादाचं प्रशिक्षण

१९ वर्षीय अली बाबरच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तो विधवा आई आणि बहिणींसोबत राहत होता. अली बाबरला गरीबीतून सुटका करण्यासाठी लष्कर ए तोयबात जाण्यास सांगितलं होतं. आईच्या उपचारासाठी पैशांचं अमिष दाखवण्यात आलं होतं. यावरुन अली बाबर आणि त्याच्यासारख्या अनेक तरुणांना पाकिस्तानी सैन्य पैशांचं अमिष दाखवत दिशाभूल करत आहे. तसेच त्यांना दहशतवादाचं प्रशिक्षण देत आहे, अशी माहिती भारतीय सैन्यानं दिलीय.

“पाकिस्तान सैन्याच्या जाबरी पोस्ट येथून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी”

भारतीय सैन्याने सांगितले, “आत्मसमर्पण करणारा दहशतवादी आतिक उर रहमानने (पिंडी गाव, अटोक जिल्हा, पंजाब, पाकिस्तान) दिलेल्या माहितीनुसार त्यांना आईच्या उपचारासाठी २०,००० रुपये देण्यात आले होते. तसेच काम झाल्यानंतर ३०,००० रुपये देण्याचं कबुल करण्यात आलं होतं.” विशेष म्हणजे दहशतवाद्यांना पाकिस्तान सैन्याच्या जाबरी पोस्ट येथून भारतात पाठवलं जात असल्याचीही माहिती या दहशतवाद्यांनी दिलीय. पत्रकार परिषदेनंतर भारतीय सैन्याने आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केलंय.

पाकिस्तानमध्ये पत्रकारांवर बंदी आणि हल्ले, हमीद मीर यांच्याकडून इम्रान खान सरकारची पोलखोल

Story img Loader