Asim Munir : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांचं एक विधान चर्चेत आलं आहे. असीम मुनीर यांनी द्विराष्ट्रीय सिद्धांताचा उल्लेख करत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र वेगवेगळे कसे झाले? यावर असीम मुनीर यांनी भाष्य केलं आहे. इस्लामाबादमध्ये बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना असीम मुनीर यांनी पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या मुलांना आपला देश कसा निर्माण झाला हे सांगण्याचं आवाहन केलं.

असीम मुनीर यांनी म्हटलं की, “आपल्या पूर्वजांना वाटायचं की आपण प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे तिथेच द्विराष्ट्रीय सिद्धांताचा पाया रचला गेला. आता आपण दोन राष्ट्रे आहोत, एक राष्ट्र नाही. आपल्या पूर्वजांनी या (पाकिस्तान) देशाच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला. त्यामुळे आपल्याला देशाचं रक्षण कसं करायचं हे माहिती आहे”, असं असीम मुनीर यांनी म्हटलं आहे.

सीम मुनीर हे पुढे म्हणाले की, “माझ्या प्रिय बंधूंनो, कृपया पाकिस्तानची कहाणी विसरू नका आणि तुमच्या पुढच्या पिढीला पाकिस्तानची कहाणी सांगायला देखील विसरू नका. त्यामुळे पुढच्या पिढीचे पाकिस्तानशी असलेले नाते कधीही कमकुवत होणार नाही. मग तिसरी पिढी असो किंवा चौथी पिढी असो किंवा पाचवी पिढी असो, त्यांना माहिती असलं पाहिजे की पाकिस्तान त्यांच्यासाठी काय आहे?”, असं असीम मुनीर यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

‘दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही…’

तसेच दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत, असंही पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच ते पुढे असंही म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या शत्रूंना असं वाटतं का की मूठभर दहशतवादी पाकिस्तानचे भवितव्य ठरवू शकतात? दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत.’असंही ते म्हणाले.