पाकिस्तानविरोधात लहान किंवा मोठे युद्ध पुकरल्यास त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील, अशी गरळ पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी सोमवारी इस्लामाबादमध्ये ओकली. परकीयांकडून होणाऱया कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास पाकिस्तानचे लष्कर समर्थ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
१९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना राहिल शरीफ यांनी भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, जर कोणत्याही परकीय शत्रूने घातपात घडवून आणून लहान किंवा मोठे युद्ध पुकारल्यास त्याचे गंभीर परिणाम त्या देशाला भोगावे लागतील. देशांतर्गत किंवा देशाबाहेरील कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यास पाकिस्तानी लष्कर तयार आहे. मग हे युद्ध पारंपरिक असो किंवा अपारंपरिक. त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
भारताचे लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या एका भाषणात भविष्यात उदभवणाऱया कोणत्याही लहान स्वरुपातील युद्धासाठी भारतीय लष्कर तयार आहे, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर राहिल शरीफ यांनी हे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा