कुख्यात गुंड छोटा राजनला काही दिवसांपूर्वी इंडोनेशिया येथे अटक करण्यात आल्यानंतर त्याचा एकेकाळचा साथीदार दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत पाकिस्तानी लष्कराकडून वाढ करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार दाऊदच्या कराची आणि इस्लामाबाद येथील निवासस्थानांबाहेर कमांडो तैनात करण्यात आले आहेत. सध्या दाऊदभोवती सुरक्षेचे तिहेरी कडे असून यामध्ये पहिल्या टप्प्यात पाकिस्तानी रेंजर्स, दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानी लष्करातील अधिकारी आणि तिसऱ्या टप्प्यात दाऊदचे खासगी अंगरक्षक आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊदने दुबई आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये कायमस्वरूपी आश्रय घेतला होता. दाऊद राहण्याची ठिकाणे वेळोवेळी बदलत असला तरी त्याचा मुक्काम हा पाकिस्तानमध्येच असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे २५ ऑक्टोबरला छोटा राजनला अटक झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून दाऊदच्या सुरक्षेसाठी विशेष कमांडोचे पथक तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे.
छोटा राजनला थोड्याच दिवसांत इंडोनेशियातून भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. यावेळी भारतीय अधिकाऱ्यांकडून केलेल्या चौकशीत राजननेही दाऊद पाकिस्तानमध्ये आयएसएसच्या संरक्षणात असल्याची माहिती दिली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा