पीटीआय, लाहोर : ‘‘पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय झाल्याबद्दल लष्कराला लाज वाटली पाहिजे. लष्कराने आता स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करावा,’’ अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानातील शक्तिशाली लष्करावर टीका केली. न्यायालयीन आदेशानंतर अटकेतून सुटका झाल्यानंतर प्रथमच इम्रान खान यांनी देशाला संबोधित केले. लाहोर येथील आपल्या निवासस्थानातून ते बोलत होते.
इम्रान यांच्याविरुद्ध दाखल १४५ खटल्यांत न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर त्यांनी तासभर देशवासीयांशी संबोधित केले. लष्कराच्या ‘इंटर सव्र्हिसेस पब्लिक रिलेशन्स’चे (आयएसपीआर) महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी इम्रान खान यांनी ढोंगी म्हटले होते. त्यावर तीव्र आक्षेप घेऊन इम्रान यांनी सांगितले, की संबंधित लष्करी अधिकाऱ्याचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून मी पाकिस्तानचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे.