‘‘काश्मीर प्रकरण हे भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांसाठी आव्हानात्मक बनलेले आहे. या मुद्दय़ाचे निराकरण व्हावे यासाठी भारताकडून वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. मात्र या मुद्दय़ाचे निराकरण व्हावे, अशी पाकिस्तान लष्कराचीच इच्छा नाही. हे प्रकरण कायम धगधगत राहावे, असेच पाकिस्तान लष्कराला वाटत आहे..’’ अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक सी. ख्रिस्ताइन फेअर यांच्या ‘फायटिंग टू द एंड : द पाकिस्तान आर्मीज वे ऑफ वॉर’ या पुस्तकात अशी माहिती देण्यात आली आहे.
काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांसाठी अस्तित्वाची लढाई बनलेला आहे. या प्रदेशावर अधिसत्ता गाजविण्यासाठी दोन्ही देशांकडून वारंवार प्रयत्न केले जातात. मात्र पाकिस्तानच्या लष्कराला काश्मीर प्रश्नाचे निराकरण व्हावे, असे वाटत नाही, असे फेअर यांनी या पुस्तकातून म्हटले आहे. काश्मीर मुद्दय़ाचे दोनही देशांकडून राजकारण केले जाते. मात्र हे राजकारण मोडीत काढण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. पाकिस्तानी लष्करच या मुद्दय़ाचे राजकारण करत असल्याचा आरोप फेअर यांनी केला. काश्मीरसंबंधित काही प्रश्नांवर भारताची आशावादी भूमिका आहे. मात्र पाकिस्तान लष्कर आडवे येत असल्याचे भारताच्या आशांवर नेहमी पाणी फिरले गेले, असे फेअर यांनी म्हटले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहिले होते. पाकिस्तानी लष्करानेच शरीफ यांना शपथविधीला उपस्थित राहण्याची सूचना केली होती. पाकिस्तान लष्कर शांतता प्रक्रिया नव्याने सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देते. मात्र त्यानंतर दहशतवादी हल्ले होतात. म्हणजेच पाकिस्तानी लष्करामध्ये काही तरी काळेबेरे आहे, असे फेअर यांनी बुधवारी या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी म्हटले. मोदी-शरीफ यांच्या भेटीबाबत अधिक बोलण्याचे फेअर यांनी टाळले. मात्र या भेटीपूर्वी अफगाणिस्तानातील दूतावासावर झालेला हल्ला हे याचे ताजे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader