नववर्षांच्या मध्यरात्री अरबी समुद्रात बुडालेल्या पाकिस्तानच्या जहाजावरील चार जण हे दहशतवादीच असल्याचा निर्वाळा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी देऊन त्या जहाजावरील चौघे तस्कर असल्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला. हे चौघे जण पाकिस्तानचे लष्कर आणि मेरिटाइम अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होते हे सूचित करणारा परिस्थितिजन्य पुरावाही उपलब्ध असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
अरबी समुद्रात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आणि नव्या वर्षांच्या पहाटे भारतीय तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या सदर जहाजावर स्फोट होऊन ते समुद्रात बुडाले होते. त्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नांना पर्रिकर यांनी सोमवारी पूर्णविराम दिला.
या जहाजाला आग लावून त्यावरील चौघांनी त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचेच सूचित केले आहे. यावरून त्यांच्या आत्मघातकी कृत्याचा प्रत्यय येतो. जहाज अडविल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला यावरून ते दहशतवादी किंवा संशयित दहशतवादी असावे, असा निष्कर्ष निघतो, असेही संरक्षणमंत्री म्हणाले. हे चौघे पाकिस्तान लष्कर, मेरिटाइम अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंधितांच्या संपर्कात होते, असेही पर्रिकर म्हणाले.
आपण करीत असलेल्या दाव्याची सत्यता काय, असे विचारले असता पर्रिकर म्हणाले की, परिस्थितिजन्य पुराव्यांवरून आपल्या दाव्याला पुष्टी मिळत असल्याचे सूचित होते. मुंबईवर २००८ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचा दावा करण्यात येत असल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर पर्रिकर यांनी वरील बाब स्पष्ट केली. या जहाजावरून तस्करी करण्यात येत असल्याचा दावाही केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा