नववर्षाच्या मध्यरात्री अरबी समुद्रात स्फोट होऊन बुडालेल्या पाकिस्तानच्या जहाजावरील चौघांचा मृत्यू हा स्फोट होण्याआधी विष प्राशन केल्यामुळे झाला असल्याची शक्यता संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी वर्तविली आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना पर्रिकर यांनी हे विधान केले. पाकिस्तानच्या किनाऱ्यावरून आलेल्या बोटीतून संशयित दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करत असताना तटरक्षकदलाच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केला होता. तटरक्षकदलाने केलेल्या कारवाईत त्या जहाजावर स्फोट होऊन ते समुद्रात बुडाले होते. परंतु, त्या जहाजाच्या स्फोट झाल्यामुळेच त्यावरील चार संशयित दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असल्याचे ठामपणे कसे सांगता येईल? कदाचित स्फोट होण्याआधी पुरावे नष्ट व्हावेत यासाठी चारही दहशतवाद्यांनी विषाच्या गोळ्या घेतल्या असाव्यात, असे विधान पर्रिकर यांनी केले. तसेच या कारवाईत सदर जहाजावरील संशयितांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले गेले नसल्याच्या आरोपांनाही फेटाळून लावत पर्रिकर यांनी कोस्ट गार्ड आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेने(एनटीआरओ) योग्य कारवाई केली असल्याचे म्हणत पाठराखण देखील केली.
तस्कर नव्हे दहशतवादीच!
याआधी त्या जहाजावरील चौघे तस्कर असल्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम देत पर्रिकर यांनी जहाजावरील चौघे दहशतवादीच असल्याचा निर्वाळा दिला होता. तसेच हे चौघे जण पाकिस्तानचे लष्कर आणि मेरिटाइम अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होते हे सूचित करणारा परिस्थितिजन्य पुरावाही उपलब्ध असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा