Pakistani Citizens In India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका बसलेल्यांमध्ये पाकिस्तानी वंशाच्या ५५ वर्षीय शारदाबाई यांचाही समावेश आहे. त्यांचे लग्न एका भारतीय नागरिकाशी झाले असून, गेल्या ३८ वर्षांपासून त्या ओडिशामध्ये राहत आहेत.

शारदाबाई, लग्नानंतरच्या शारदा कुकरेजा यांचा जन्म १९७० मध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सुक्कुर शहरात झाला होता, असे त्यांच्या पाकिस्तानी पासपोर्टवरून दिसून येते. जिल्हा पोलिसांनी त्यांना भारत सोडण्याची नोटीस पाठवली आहे. यामध्ये म्हटले आहे की, शारदाबाई यांच्याकडे भारताचा दीर्घकालीन व्हिसा नाही किंवा त्या सूट दिलेल्या श्रेणींमध्येही येत नाहीत. त्यांनी दिलेल्या मुदतीत भारत सोडला नाही तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शारदाबाई म्हणाल्या की, त्यांचे वडील १९८७ मध्ये त्यांच्या सहा मुलांसह ६० दिवसांच्या व्हिसावर भारतात आले आणि ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यात स्थायिक झाले.सुमारे ३५ वर्षांपूर्वी शारदाबाई यांचे लग्न बोलांगीर येथील एका व्यावसायिकाशी झाले आहे. त्यांना आता एक मुलगा, एक मुलगी आणि दोन नातवंडे आहेत, जे भारतीय नागरिक आहेत.

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड असल्याचा दावा करणाऱ्या शारदाबाई म्हणाल्या की, त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी खूप वर्षांपूर्वी अर्ज केला होता परंतु त्यांना आतापर्यंत भारतीय नागरिकत्व मिळू शकले नाही.

कायदेशीर कारवाईचा इशार

बोलंगीरच्या पोलीस अधीक्षकांनी शनिवारी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आमच्या उपलब्ध नोंदीनुसार, तुमच्याकडे वैध दीर्घकालीन व्हिसा नाही आणि तुम्ही सवलतीच्या श्रेणीतील व्हिसामध्येही येत नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर भारत सोडण्याचे निर्देश देण्यात येत आहेत, अन्यथा तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.”

कुटुंबापासून वेगळे करू नका

पत्रकारांशी बोलताना शारदाबाईंनी सरकारला विनंती केली की, त्यांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे करू नये. पाकिस्तानात त्यांचे कोणीही नाही. “मी इथे आल्यापासून मी भारताला माझा देश मानला आहे. माझे कुटुंब भारतात आहे. त्यामुळे मला पाकिस्तानात जायचे नाही. मी कधीही पाकिस्तानातील कोणाशीही बोलले नाही, अगदी फोनवरही.” याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.