शांततामय मार्गाने आंदोलन करण्यास न्यायालयाने अखेरच्या क्षणी परवानगी दिल्याने नवाज शरीफ सरकारविरोधी हजारो निदर्शकांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा भव्य मोर्चाला गुरुवारी आरंभ केला. राजधानी इस्लामाबादेत यामुळे हिंसाचार उसळण्याच्या भीतीने शहराला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले असून महत्त्वाच्या सर्व मार्गाची कडेकोट नाकाबंदी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही मार्गावरील अडथळे सरकारने हटवले.
पाकिस्तानच्या स्थापना दिनाचा मुहूर्त साधून माजी क्रिकेटपटू इम्रान खान आणि धार्मिक नेते ताहिरूल काद्री यांनी हा भव्य मोर्चा आयोजित केला आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत नवाज शरीफ प्रचंड मताधिक्याने निवडून आले असले तरी त्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून शरीफ यांनी मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा करावी, अशी मागणी काद्री यांच्या ‘पाकिस्तान अवामी तहरीक’ आणि इम्रान खान यांच्या ‘इन्कलाब’ मोर्चाने केली आहे. पाकिस्तान ‘तेहरीक ए इन्साफ’चे नेते इम्रान खान यांनी लाहोरमधील झमन पार्क येथून आझादी मोर्चाला आरंभ केला, तर काद्री यांनी शहरातील मॉडेल टाऊन येथून ‘इन्कलाब मोर्चा’ची हाक दिली. काद्री आणि खान यांनी एकमेकांना अधिकृतरीत्या पाठिंबा जाहीर केला नसला तरी भ्रष्टाचारी सरकारला खाली खेचण्याची एकमुखी मागणी त्यांनी केली आहे.
खान यांच्या मोर्चातील महिला आणि लहान मुले आघाडीवर होती. न्यायालयाने शांततामय मार्गाने मोर्चाला परवानगी दिल्याने शरीफ सरकारने रस्त्यांवर आडवे केलेले मोठमोठे कंटेनर हटवण्यात आले. तुम्हाला खरे स्वातंत्र्य हवे असल्यास माझ्यासाठी नाही, तर तुमच्या मुलांसाठी या मोर्चात सामील व्हा, असे आवाहन खान यांनी मोर्चासमोर केलेल्या भाषणात केले.
या वेळी त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराचा निषेध केला. काही वेळ चाललेल्या गोंधळानंतर सरकारने काद्री यांच्या समर्थकांना मॉडेल टाऊन परिसर सोडण्याची परवानगी दिली. काद्री यांना मोर्चा काढण्यास सुरुवातीला मनाई करणाऱ्या सरकारने नंतर त्यांना परवानगी देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया सूत्रांनी पत्रकारांशी बोलतान दिली.
 
‘देशातील वंचितांना त्यांचे घटनात्मक आणि लोकशाही हक्क मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला असून पाकिस्तान स्थापना दिनाच्या नागरिकांना मी शुभेच्छा देतो,’
– ताहिरूल काद्री, धर्मगुरू