पाकिस्तानमध्ये बसला लागलेल्या भीषण आगीत १८ पूरग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नऊ महिला आणि आठ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त कुटुंब दक्षिणेतील कराचीतून मूळगावी खैरपूर नाथन शाहमध्ये जात असताना ही घटना घडली, अशी माहिती पोलीस अधिकारी हाशिम ब्रोही यांनी दिली आहे. पुराचा तडाखा बसल्याने पाकिस्तानातील हजारो नागरिकांनी कराचीत आश्रय घेतला आहे. या ठिकाणाहून परतत असताना पीडित कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
बसमधील एसीमध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा नुरियाबाद परिसरात लागलेल्या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्याने बसमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचले, असे ब्रोही यांनी सांगितले आहे.
जखमींवर सध्या जमशोरो आणि नुरियाबादमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत पूर्णपणे जळाल्यामुळे काही जणांची ओळख पटवणे प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. ओळख पटलेल्या नागरिकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे अंत्यविधीसाठी पाठवण्यात आले आहेत.