पाकिस्तानने या महिन्यात दहाव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून त्यांच्या सैनिकांनी काश्मीरच्या पूँच्छ जिल्ह्य़ातील नियंत्रण रेषेनजीक रविवारी बेछूट गोळीबार केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या कृत्याला सीमेनजीकच्या भारतीय लष्करानेही तसाच कडवा उलट जबाब दिला. मात्र या गोळीबारात कोणालाही इजा झाली नाही, असे सांगण्यात आले.
पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी सकाळी आठच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक भारतीय फौजांच्या चौक्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी येथे ही माहिती दिली. १ ऑक्टोबरपासून रविवापर्यंत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे केलेले हे दहावे उल्लंघन आहे, असे मेहता म्हणाले. नियंत्रण रेषेनजीक सात वेळा, तर जम्मूजवळ तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याने पँूच्छ जिल्ह्य़ातील नियंत्रण रेषेजवळ शनिवारीही उखळी तोफांचा मारा केला. भारताच्या फौजांनीही त्यास तसेच चोख प्रत्युत्तर दिले.
३ ऑक्टोबर रोजीही पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळच्या गावांच्या दिशेने बेछूट गोळीबार करून तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. तसेच काश्मीरमधील गुलमर्ग आणि जम्मू भागातही पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक मुलगी ठार झाली, तर अन्य सहा जण जखमी झाले. १ आणि २ ऑक्टोबर रोजीही पाकिस्तानी सैन्याने पँूच्छ परिसरातच शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात सहा जण जखमी झाले, तर काही घरांचीही नासधूस झाली.
केंद्राकडू पाकिस्तानचा निषेध
पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेनजीक शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याबद्दल भाजपने पाकिस्तानचा निषेध केला असून अशा प्रकारच्या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्याच्या सूचना संरक्षण दलांना देण्यात आल्या असल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होत असलेल्या गोळीबाराबद्दल विचारले असता आम्ही याचा निषेध करीत असून त्याचा समाचार घेण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व करण्याच्या सूचना संरक्षण दलांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ातील नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी सैन्याने रविवारी मोठय़ा प्रमाणावर गोळीबार केला. या महिन्यातील ही दहावी घटना असून सीमेवरील तैनात असलेल्या भारताच्या फौजांनी पाकिस्तानच्या या आगळिकीला तसेच प्रत्युत्तर दिले.
या संदर्भात बोलताना पाकिस्तानला अंतर्गत समस्यांनी वेढले आहे, याकडे रवीशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आगेकूच करीत आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानला नैराश्य आले आहे. अंतर्गत समस्यांमुळेही तो देश निराश आहे, असे रवीशंकर प्रसाद म्हणाले. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबद्दल पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारतावर दोषारोपण केले आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, मुशर्रफ यांनाच त्यांच्या देशात कोणी गांभीर्याने घेत नाही. मग अशा वेळी तुम्हीही त्यांचे म्हणणे गंभीरपूर्वक घेऊ नका, असा सल्ला प्रसाद यांनी पत्रकारांना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा