मुंबईत २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याबाबतचा खटला सध्या येथील न्यायालयात सुरू आहे. मात्र या खटल्याची बुधवारची सुनावणी न्यायाधीशाला ‘बरे वाटत’ नसल्याने पुढे ढकलण्यात आली. या हल्ल्यात १६६ जण मृत्युमुखी पडले होते तर आणखी अनेकजण जखमी झाले होते.
या खटल्याची सुनावणी पाकिस्तानच्या ‘दहशतवादविरोधी न्यायालया’त सुरू आहे. या खटल्यात ७ आरोपी आहेत. बुधवारी रावळपिंडीतील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश आतिकउर रहमान यांच्यासमोर सुनावणी होणार होती. ते न्यायालयात उपस्थितही होते. परंतु ‘आपल्याला बरे वाटत नाही’, असे कारण देत त्यांनी ही सुनावणी पुढे ढकलली. आता ही सुनावणी पुढील बुधवारी, २ जुलै रोजी होणार आहे.
या खटल्याच्या मागील सुनावणीला, १८ जून रोजीसुद्धा फिर्यादी पक्षाचा कोणीही वकील उपस्थित नसल्याने काहीही कामकाज झाले नव्हते.
आपल्याला पुरेसे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या वकिलांनी सरकारकडे केली आहे. पुरेसे संरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ आजवर तीन वेळा या वकिलांनी सुनावणीवर बहिष्कार घातला आहे. पाकिस्तानातील ‘जमात उद् दवा’ या अतिरेकी संघटनेतर्फे आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याची या वकिलांची तक्रार आहे.

Story img Loader