पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना परदेशात जाण्यास सिंध उच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली. परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीतून मुशर्रफ यांचे नाव काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मुशर्रफ परदेशात जाण्यास परवानगी देण्याची मागणी न्यायालयाकडे करीत होते. मात्र, सातत्याने त्यांची मागणी फेटाळली जात होती. मुशर्रफ यांची आई आजारी असून, तिची विचारपूस करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला जाण्याची परवानगी त्यांनी न्यायालयाकडे मागितली होती. त्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने वरील आदेश दिला.
न्या. मोहंमद अली मझर आणि न्या. शाहनवाझ यांच्या न्यायालयाने मुशर्रफ यांना परदेशात जाण्यास परवानगी दिली. सत्तर वर्षीय मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानात राष्ट्रद्रोहासह इतर अनेक खटले सुरू आहेत. मुशर्रफ यांना परदेशात जाण्यास सरकारी वकिलांनी विरोध केला. अशी परवानगी दिल्यास मुशर्रफ फरार होतील आणि त्यांच्याविरुद्धचे खटले प्रलंबित राहतील, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर मुशर्रफ यांना तातडीने देश सोडता येणार नाही. पाकिस्तानातील कायद्याप्रमाणे निकालानंतर सरकारी वकिलांना सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यामुळे १५ दिवस मुशर्रफ देश सोडू शकणार नाही.

Story img Loader