पाकिस्तान सरकारने देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत या पूरामध्ये ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. देशातील ३० लाख लोक बेघर झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जूनपासून पाऊस
पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये सर्वाधिक म्हणजे ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ जूनपासून या भागामध्ये अनेकदा जोरदार पाऊस पडला असून वेगवगेळ्या दुर्घटनांमध्ये लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. पाकिस्तानमधील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीने या कालावधीमध्ये मरण पावलेल्याची आकडेवारी जाहीर केली आहे.

अनेक भागांमध्ये लोकांचा मृत्यू
बलुचिस्तानमध्ये एकूण २३४ जणांचा या पूरामुळे मृत्यू झाला आहे. तर खैबर-पख्तूनख्वामध्ये १८५ आणि पंजाब प्रांतात १६५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला असून गिल्ट-बालटीस्तानमध्ये एकूण नऊ जण मरण पावले आहेत.आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यात १६६.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सरासरी या भागामध्ये ४८ मिमी पाऊस होतो. यंदा मात्र पर्जन्यामध्ये २४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

७८४ टक्के अधिक पाऊस
सिंध आणि बलुचिस्तानला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सिंधमध्ये ७८४ टक्के तर बलुचिस्तानमध्ये ४९६ टक्के अधिक पाऊस पडल्याचं वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिलं आहे. अचानक मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्याने पूर आले. खास करुन दक्षिण पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील २३ जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीबाधित म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

वॉर रुमची स्थापना…
वातावरण बदलासंदर्भातील मंत्री शेरी रेहमान यांनी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये वॉर रुम सुरु करण्यात आल्याचं सांगितलं आहे. देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये मदत पोहचवण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे. ही पर्जन्यवृष्टी भयानक असून पावसामुळे आम्हाला मदतकार्य पोहचवण्यात खास करुन हेलिकॉप्टरने मदत पोहचवण्यात अडचणी येत असल्याचं रेहमान म्हणाल्या.

२०१० पेक्षाही भयंकर परिस्थिती
रेहमान यांनी मागील आठवड्या या परिस्थितीची तुलना २०१० मधील पूरपरिस्थितीशी केली होती. मात्र आता त्यांनी परिस्थिती तेव्हापेक्षाही अधिक भयंकर असल्याचं म्हटलं आहे. “२०१० मध्ये केवळ उत्तरेकडून पाणी वाहत होते. मात्र यंदा पाण्याचा वेग अधिक असून त्यामुळे बराच परिसर उद्धवस्त झाला आहे,” असं रेहमान म्हणाले. अनेक ठिकाणी पूल, रस्ते वाहून गेले आहेत. “जवळजवळ ३० लाख लोकांच्या डोक्यावरील छप्पर या पूरात वाहून गेलं आहे. हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून अनेकांकडे दोन वेळेचं अन्नही नाही” असंही रेहमान यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan declares national emergency as flood death toll reaches 937 scsg