पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील वाद आता आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि गुजरातमध्ये २००२ साली झालेली गोध्रा दंगल यांच्यात साम्य असल्याचे आसिफ यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील हिंसा ही मोदींनी गुजरातमध्ये विशिष्ट धार्मिक समुहाला संपविण्यासाठी केलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती असल्याचे ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.


काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये येत्या १९ तारखेला काळा दिवस साजरा करण्यात येणार आहे. पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संसदेमधील विशेष बैठकीत शुक्रवारी निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. काश्मीरवासियांच्या स्वतंत्र लढाईसाठी पाकिस्तान राजकीय आणि नैतिकतेतून समर्थन करेल, असे आश्वासन पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिले आहे. दरम्यान, भारतीय परराष्ट्रमंत्रालयाकडून पाकिस्तानच्या या कृतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील काही घटकांकडून जम्मू-काश्मीरमधील जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा प्रभाव असलेल्या भागात राजकीय फायदा मिळविण्यासाठी हे सगळे सुरू आहे. मात्र, हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत पोलिस आणि स्थानिक जनता यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात अनेकजण जखमी झाले आहेत.