Tahawwur Rana Pakistan Reaction: २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेने भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर, या प्रकरणी पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने तहव्वूर राणाचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “तहव्वूर राणाने गेल्या दोन दशकांत त्यांच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे तो कॅनेडियन नागरिक असल्याचे अगदी स्पष्ट आहे.”

तहव्वूर राणाचे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयशी असलेले संबंध हे उघड गुपित असल्याने पाकिस्तान त्याच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करत आहे. राणा मुंबईतील २६/११ हल्ल्याच्या कटात पाकिस्तानची भूमिका उघड करेल, अशी त्यांना भीती आहे.

पाकिस्तानी लष्करात नोकरी

१९६१ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या राणाने पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये सेवा बजावली असून, त्यानंतर १९९० च्या दशकात तो कॅनडाला गेला आणि तिथले नागरिकत्व घेतले. २६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी राणा याचे संबंध असल्याचे मानले जाते. हल्ल्यापूर्वी राणाच्या इमिग्रेशन कन्सल्टन्सीचा कर्मचारी म्हणून हेडलीने मुंबईची रेकी केली होती.

एनआयएचे हे पथक तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी रविवारीच अमेरिकेत पोहोचले होते. मंगळवारी संध्याकाळी लॉस एंजेलिसमध्ये उपमहानिरीक्षक जया रॉय यांनी राणाला ताब्यात घेण्यासाठी ‘सरेंडर वॉरंट’वर स्वाक्षरी केली होती. यानंतर, भारतीय पथकाने बुधवारी सकाळी राणाला एका खास विमानाने भारताकडे रवाना केले होते. या कारवाईत इतर तीन गुप्तचर अधिकाऱ्यांनीही सहकार्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहे तहव्वूर राणा?

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक असून, त्याला अमेरिकेत बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने लष्कर-ए-तैयबाचे काम केल्याबद्दल आणि २६ ते २९ नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर-ए-तैयबाला मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान मुंबई दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दल, नागरिक आणि परदेशी पर्यटकांसह १७४ हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

१७४ हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या लष्कर-ए-तैय्यबाल भौतिक मदत केल्याबद्दल तहव्वूर राणाला अमेरिकेत दोषी ठरवण्यात आले होते. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी राणाचे प्रत्यार्पण हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. केंद्र सरकारने एनआयए प्रकरणाशी संबंधित खटले आणि इतर बाबी चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून वकील नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे.