Pakistan Diplomats Video: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतासह संपूर्ण जगात संतापाची लाट उसळली आहे. अनेक देशांच्या प्रमुखांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच जगभरात पसरलेले भारतीय नागरिक त्या त्या ठिकाणी हल्ल्याच्या विरोधात निषेध नोंदवत आहेत. लंडन येथेही भारतीय नागरिकांनी पहलगाम हल्ल्याच्या विरोधात निदर्शने केली. लंडनमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर शांतपणे निदर्शने सुरू असताना एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने आक्षेपार्ह हातवारे केले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता संताप व्यक्त होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये भारतीय नागरिक शांतपणे निदर्शने करताना दिसत आहेत. मात्र त्याचवेळी उच्चायुक्तालयामधील पाकिस्तानी अधिकारी समोर येऊन हाताने गळा चिरण्याची कृती करून दाखवतो. या कृतीतून सदर अधिकारी भारतीय नागरिकांना धमकावत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सदर अधिकारी ब्रिटनमध्ये पाकिस्तानी मिशनवर असून त्याचे नाव कर्नल तैमूर राहत असल्याचे सांगितले जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सदर अधिकाऱ्याच्या हातात भारताच्या वायू सेनेचे ग्रुप कॅप्टन कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा फोटो असलेला फलक दिसत आहे. त्यांच्या फोटोखाली ‘Chai is Fantastic’ असे लिहिले आहे. निदर्शन करणाऱ्यांना उकसविण्यासाठीच ही कृती केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे इतका भीषण हल्ला झाल्यानंतरही पाकिस्तानी अधिकारी आपली असंवेदनशील वृत्ती जगासमोर दाखवत आहेत.

कोण आहेत अभिनंदन वर्धमान?

२०१९ साली भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 विमानाला हुसकावून लावत असताना भारतीय वायू सेनेचे तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. अभिनंदन यांनी मिग २१ बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ १६ फायटर विमानावर वर आर- ७३ मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले मिसाइल वर्धमान यांच्या मिग २१ बायसन विमानाला धडकले. त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले होते.

लंडनमधील पाकिस्तानी अधिकाऱ्याने अभिनंदन वर्धमान यांचे फलक दाखवून निदर्शकांना चिथावणी देण्याचा प्रकार केला. त्यामुळे या प्रकारावर आता चौफेर टीका होऊ लागली आहे.