बांगलादेशने देश सोडण्यास सांगितलेला पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी आर्थिक दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
ढाक्यातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा मोहम्मद मझहर खान हा भारतीय चलनातील बनावट नोटा बाजारात आणण्याच्या कामाला अर्थसाहाय्य करण्यासह बनावट चलन तयार करण्यात गुंतलेला असल्याचा अहवाल बांगलादेशच्या गुप्तचर संस्थांनी दिल्यानंतर, पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या सरकारने या कर्मचाऱ्याला हटवावे, असे पाकिस्तानला सांगितले होते. संबंधित अधिकारी पाकिस्तानला परतल्याच्या वृत्ताला विदेश विभागाच्या सचिव तस्नीम अहमद यांनी दुजोरा दिला. या अधिकाऱ्याची हकालपट्टी दुर्दैवी असून, त्याच्याविरुद्धचे सर्व आरोप निराधार आहेत, असे त्या म्हणाल्या.
या घटनेमुळे ढाक्यातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय केवळ दबावाखालीच नसून, बांगलादेशी गुप्तचर संस्था त्याच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे वृत्त ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिले आहे.

Story img Loader