Pakistan Earthquake : पाकिस्तानात आज (दि.१२) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पाकिस्तानला ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची खोली १० किमी एवढी होती. तसेच या भूकंपाचे तीव्र धक्के भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्येही जाणवले आहेत. श्रीनगर, जम्मू, शोपियान आणि काश्मीरसह अनेक भागात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका मुलासह किराणा दुकानात साहित्य खरेदी करत असताना दिसत आहे. पण एवढ्यात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवल्याने सदर व्यक्ती दुकानातून पळताना दिसत आहे. असं वृत्त पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

भूकंपाचे धक्के जाणवताच लोक जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेकडे धावत असल्याचे काही व्हिडीओत दिसत आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. दरम्यान, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानेही या संदर्भातील माहिती दिली आहे.

या भूकंपाबद्दल माहिती देताना राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने म्हटलं की, “शनिवारी (१२ एप्रिल) दुपारी १:५५ वाजता पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, त्याची तीव्रता ५.३ रिश्टर स्केल तीव्रता मोजली गेली आहे. तसेच या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या जमिनीत १० किलोमीटर खोलवर होता.

पाकिस्तानला एकाच दिवसात दोनदा भूकंपाचा धक्का

माध्यमातील वृत्तानुसार, शनिवारी (१२ एप्रिल) पाकिस्तानमध्ये एकाच दिवसात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ११:५५ वाजता पाकिस्तानमध्ये पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची खोली पाकिस्तानी जमिनीखाली १० किलोमीटर एवढी होती. तसेच वृत्तानुसार, इस्लामाबाद, रावळपिंडी, अट्टोक, चकवाल आणि पंजाबच्या इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पंजाब व्यतिरिक्त, खैबर पख्तूनख्वामधील पेशावर येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.