पाकिस्तानातील निवडणुकीत मतदारांनी तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांच्या पक्षाला भरभरून मते दिली आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याच्या पक्षाला घरचा रस्ता दाखविला. मात्र जनतेला नव्या पाकिस्तानचे स्वप्न दाखवणाऱ्या ‘गुलछबू’ इम्रान खान यांना खरोखरच नवा पाकिस्तान घडवता येईल काय? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आला आहे. आपल्या देशात बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी पाकिस्तानचे दहशतवादी ‘चरित्र’ बदलावे लागेल, पराकोटीचा हिंदुस्थानद्वेष सोडावा लागेल, काश्मिरातील अतिरेक्यांची घुसखोरी थांबवावी लागेल, पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डे, तोयबा–जैश–तालिबानचा इस्लामी दहशतवाद नष्ट करावा लागेल. अर्थात पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी लिहिलेल्या पटकथेनुसार पंतप्रधान होण्यासाठी निघालेल्या इम्रान खान यांना ते शक्य होईल का? अशी शंका सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे.

अग्रलेखात म्हंटले आहे की,

‘दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये बहुचर्चित सार्वत्रिक निवडणूक पार पडली. अपेक्षेप्रमाणे यावेळी रक्तरंजित मतदान झाले. त्याचे बहुतांश निकालही आता समोर आले आहेत. या निवडणुका किती स्वच्छ वातावरणात झाल्या आणि एखाद्या पटकथेबरहुकूम त्या कशा राबवल्या गेल्या हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पाकिस्तानचे जगप्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गळय़ात पाकिस्तानी जनतेने विजयाची माळ घातली आहे. राजकारणात यशस्वी होण्याचे आणि एक ना एक दिवस पाकिस्तानचा पंतप्रधान बनण्याचे इम्रान खान यांचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न अखेर पूर्णत्वास गेले आहे.

नवाज शरीफ यांनी हिंदुस्थानात कशी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ते मोदी यांचे कसे मित्र आहेत असा प्रचार इम्रान खान यांनी केला तर ‘प्ले बॉय’ अशी इमेज असलेल्या इम्रानची मुले हिंदुस्थानसह अनेक देशांत खेळत आहेत असा हल्ला त्यांच्या विरोधकांनीही चढवला. त्यांच्या तीन-तीन लग्नांची कहाणीही रंगवून सांगितली गेली. माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि आसिफ अली झरदारी यांचे मोठे आव्हान इम्रान खानसमोर होते, मात्र या दोन्ही पॉवरफुल घराण्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध देशभर रान उठवून इम्रान यांनी आपल्या प्रचारसभांतून पाकिस्तानी जनतेला स्वच्छ कारभाराची हमी दिली.

विजयाची माळ इम्रान खान यांच्याच गळय़ात पडावी असा चंग खुद्द पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआयनेच बांधलेला असल्यामुळे शरीफ यांची कोणतीही मात्रा चालली नाही. इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी हा पक्ष बहुमताच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आहे. २७२ सदस्य संख्या असलेल्या नॅशनल असेंब्ली या पाकिस्तानी संसदेत बहुमताचा १३७ हा जादुई आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही. मात्र १२० च्या आसपास जागा जिंकून इम्रान खान हेच पंतप्रधानपदाच्या खुर्चीच्या सर्वात जवळ पोहोचले आहेत. जेमतेम १७ जागांची तजवीज इम्रान यांना करावी लागेल.’

भाजपलाही टोला

‘पाकिस्तानी जनतेला नव्या पाकिस्तानचे म्हणजेच एका अर्थाने पाकिस्तानच्या आयुष्यात ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवून इम्रान खान यांनी या निवडणुका जिंकल्या खऱ्या; पण हे ‘अच्छे दिन’चे हाडूक कसे गळय़ात अडकते हे इम्रानला सत्तेच्या त्या काटेरी खुर्चीवर बसल्यावरच कळेल’, असे नमूद करत सामनातून भाजपलाही टोला लागवण्यात आला आहे.

Story img Loader