दहशतवादी कारवाया, लष्करी यंत्रणेचा वचक आणि आर्थिक चणचण अशा संकटांमुळे गेली अनेक वर्षे राजकीय अस्थैर्याखाली वावरत असलेल्या पाकिस्तानच्या जनतेने रविवारी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (पीएमएल-एन) पक्षाला कौल देत सत्तास्थानी बसवले. तालिबानच्या धमक्यांना भीक न घालता जनतेने निर्भयपणे केलेले मतदान आणि देशाच्या इतिहासात प्रथमच लोकशाही मार्गाने झालेले सत्तांतर या निवडणुकीची वैशिष्टय़े ठरली. रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या निकाल व कल यांच्यानुसार पीएमएल-एन पक्षाला १२५हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज असून छोटय़ा पक्षांच्या मदतीने नवाझ शरीफ हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये एका नागरी सरकारकडून दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्तेची सूत्रे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लाहोर येथे समर्थकांसमोर बोलताना शरीफ यांनी पाकिस्तानच्या मतदारांचे आभार मानले व दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा वायदा केला. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय धोरण करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. ‘अंतिम निकालात आमच्या पक्षाला निखळ बहुमत मिळेल अशी प्रार्थना लोकांनी करावी कारण तसे झाले तर आपल्याला कमकुवत आघाडी सरकारचे नेतृत्व करावे लागणार नाही,’ असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा