भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास करणारे पाकिस्तानातील एक अधिकारी कामरान फैझल यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून काढण्यात आला असला तरी या अधिकाऱ्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. फैझल यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या  नसून हत्या करण्यात आल्याचे सूचित केल्यामुळे पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
नॅशनल अकाऊण्टेबिलिटी ब्युरोचे सहसंचालक कामरान फैझल हे शुक्रवारी सरकारी निवासस्थानात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. पाकिस्तानातील ऊर्जा प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी पंतप्रधान रझा अश्रफ यांनी लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या प्रकरणाची चौकशी एका पथकाकडून करण्यात येत असून फैझल हे त्या पथकातील एक अधिकारी होते.
जखमांच्या खुणा
फैझल यांच्या मृतदेहावर अन्त्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना स्नान घालण्यात आले तेव्हा त्यांच्या हातावर, पाठीवर आणि कंबरेवर जखमांच्या खुणा आढळल्या, असे त्यांचे चुलते तारिक मसूद यांनी पंजाब प्रांतातील मियान चन्नू येथे वार्ताहरांना सांगितले. फैझल यांच्या दुसऱ्या चुलत्यानेही त्यांच्या शरीरावर जखमा पाहिल्याचे सांगितले.
फैझल यांच्या शरीरावरील जखमांच्या खुणा एका वृत्तवाहिनीने दाखविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे वडील अब्दुल हमीद यांनी जखमांच्या खुणा वार्ताहरांना दाखविल्या असून आपल्या पुत्राच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. फैझल यांनी आत्महत्या केली यावर आमचा विश्वासच नाही, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याने आम्ही शल्यविशारद, फिजिशियन आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा समावेश असलेली एक पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे, असे हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले.

Story img Loader