Pakistan Ex PM Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. यापूर्वी मार्चमध्येच इम्रान खान यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलीस प्रशासनाला यश आलं नव्हतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज मंगळवारी इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. यावेळी पाकिस्तानी रेंजर्संच्या तुकडीने त्यांना अटक केली. त्यांना अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, इम्रान खान यांचा अटकेआधीचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका इंटेलिजन्स अधिकाऱ्याने माझी हत्या करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला, असा दावा इम्रान खान यांनी संबंधित व्हिडीओत केला आहे.

हेही वाचा- VIDEO: Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

संबंधित व्हिडीओत इम्रान खान म्हणाले, “मी आता इस्लामाबादला जात आहे. आज मला पुन्हा न्यायालयात हजर राहायचं आहे. इस्लामाबादला जायच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छित आहे. पहिलं म्हणजे आयएसपीआरने (Inter-Services Public Relations) जबाब दिला की, मी पाकिस्तानी सैनिकांचा अनादर केला. यासाठी त्यांनी एका इंटेलिजन्स अधिकाऱ्याचं नाव सांगितलं. पण त्याच अधिकाऱ्याने माझी हत्या करण्याचा दोनदा प्रयत्न केला. मी देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रमुख आहे. गेल्या ५० वर्षांपासून देशातील जनता मला ओळखते. त्यामुळे मला खोटं बोलायची काहीही गरज नाही. पण या व्यक्तीने माझी दोन वेळा हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत जेव्हा तपास होईल, तेव्हा तो हाच माणूस होता, हे मी सहजपणे सिद्ध करेन. याच्याबरोबर एक संपूर्ण टोळी आहे. तसेच त्याच्याबरोबर आणखी कोण-कोण आहे? तेही संपूर्ण देशाला माहीत आहे.”

“माझा प्रश्न असा आहे की, जेव्हा या माणसाचं नाव समोर आलं, तेव्हा या देशाचा माजी पंतप्रधान या नात्याने मला त्याच्याविरोधात एक एफआयआरही दाखल करता आला नाही. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाला किंवा तपास झाला तरच खरं काय आणि खोटं काय? हे समोर येईल. ती व्यक्ती निर्दोष असती, तर तपासातून सर्व बाबी पुढे आल्या असत्या. पण ही व्यक्ती एवढी शक्तिशाली आहे की, मी देशाचा माजी पंतप्रधान असूनही मला त्याच्याविरोधात साधा एक एफआयआरही दाखल करता आला नाही. मग त्याच्या मागे कोणती शक्ती आहे, असा माझा प्रश्न आहे,” असंही इम्रान खान व्हिडीओत म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan ex pm imran khan arrested in islamabad court attempt to murder twice imran khan claim viral video rmm